जिल्ह्यात अडीचहजार रुग्णांपैकी 87 टक्के रुग्णांवर घरीच उपचार

109 रुग्णांना प्राणवायू तर 24 रुग्ण अतिदक्षतेत
। अलिबाग । भारत रांजणकर ।
रायगड जिल्ह्यात कोरोनाच्या तिसर्‍या लाटेत मोठया संख्येने रुग्ण आढळू लागले आहेत. गेल्या 15 दिवसात रुग्णवाढीने प्रचंड वेग घेतला आहे. 20 डिसेंबरपर्यंत दहाहून कमी रुग्ण आढळत असताना तो वेग दुपट होत 700 वर जाऊन पोहचला आहे. 200 च्या घरात विद्यमान रुग्ण असलेली संख्या आतापर्यंत कमालीची वाढून 2 हजार 371 वर पोहचली आहे. एवढया मोठया प्रमाणात रुग्ण आढळत असले तरी दिलासादायक म्हणजे त्यापैकी 2 हजार 238 रुग्णांमध्ये कमी लक्षणे असल्याने विलगीकरण करीत त्यांच्यावर घरीच उपचार केले जात आहेत. तर रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांपैकी 109 रुग्णांना प्राणवायू लावण्याची आवश्यकता भासलेली आहे. तर 24 रुग्ण अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत.
तिसर्‍या लाटेचा परिणाम मावळत्या वर्षापासून जिल्ह्यात जाणवू लागला आहे. डिसेंबर महिन्यात रुग्णसंख्या रोडावत जात एकेरी संख्येवर पोहचली होती. त्यामुळे जिल्ह्यातील जनता मोकळा श्‍वास घेत होती. 20 डिसेंबर पर्यत 8 रुग्ण आढळत असतानाच 21 डिसेंबर रोजी ही संख्या तिपटीने वाढून 29 रुग्णांची नोंद झाली होती. त्यावेळी विद्यमान रुग्णांची संख्या देखील 210 वर होती. दोनच दिवसात हि संख्या 48 वर जाऊन पोहचली. तर 29 डिसेंबरला 88 वर रुग्ण आढळल्याने भितीची पाळ चुकचुकू लागली. विद्यमान रुग्णांनी देखील 399 चा आकडा गाठला होता. वर्षाच्या अखेरच्या दिवशी म्हणजेच 31 डिसेंबर रोजी रुग्णांची संख्या थेट 180 वर जाऊन पोहचली. नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी 196 रुग्णांनी नववर्षांचे स्वागत झाले. तर दुसर्‍या दिवशी 284 रुग्ण आढळले. 4 जानेवारीला या संख्येत 418 संख्येची मोठया प्रमाणावर भर पडून विद्यमान रुग्णांची संख्या 1 हजार 890 वर जाऊन पोहचली. पाच जानेवारीला 749 रुग्ण आढळून विद्यमान रुग्णसंख्या 2 हजार 563 वर गेली. त्यामुळे इतक्या मोठया प्रमाणावर वाढलेली रुग्णसंख्या पाहता चिंता व्यक्त केली जाऊ लागली.
मे 2021 च्या तुलनेत ही रुग्णवाढ सर्वाधिक जास्त असल्याचे प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले. गेल्या 15 दिवसांत 2 हजार 914 रुग्ण वाढले आहेत. दिलासादायक म्हणजे यात मृतांची संख्या गतवर्षीच्या तुलनेत बरीचशी कमी आहे. यावर्षी 20 दिवसांत 8 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

Exit mobile version