राज्य सरकारकडून पाच लाखांची मदत जाहीर , कंपनी परिसरात पोलिसांचा सौम्य लाठीमार
| नागपूर | वृत्तसंस्था|
येथील बाजारगाव गावातील सोलर एक्सप्लोसिव्ह कंपनीत रविवारी स्फोट झाला. या स्फोटात नऊ जणांचा मृत्यू झाला असून, त्यामध्ये 6 महिला आणि 3 पुरुषांचा समावेश आहे. सोलर एक्सप्लोसिव्ह कंपनीतील कास्ट बूस्टर प्लांटमध्ये पॅकिंगच्या वेळी हा स्फोट झाला आहे. कामगारांनी कंपनीबाहेर गर्दी करुन घोषणाबाजी केली. त्यांना हटवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. युवराज चरोदे, ओमेश्वर मछिर्के, मिता युकी, आरती सहारे, श्वेताली मारबते, पुष्पा मनपुरे, भाग्यश्री लोणारे, रुमिता युकी, मोसम पटले अशी मृतांची नावे आहेत. या घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या वारसांना पाच लाख रुपयांची आर्थिक मदत राज्य सरकारतर्फे देण्यात येईल. त्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिली आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.
स्फोटानंतर वेगवेगळ्या युनिटमधील सर्व कर्मचारी बाहेर पडले. सकाळी 9 ते साडे नऊ वाजण्याच्यादरम्यान ही घटना घडली. दुपारपर्यंत कामगारांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले नव्हते. या घटनेनंतर कामगारांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला होता. जोपर्यंत मृत कामगारांचे मृतदेह मिळत नाही, तोपर्यंत कंपनीच्या प्रवेशद्वाराहून हटणार नसल्याची भूमिका कामगारांकडून घेण्यात आली होती. स्थानिक पोलिसांनी परिस्थिती चिघळू नये म्हणून राज्य आपत्ती प्रतिसाद दल, दंगल नियंत्रक पथकाला पाचारण करण्यात आले होते. कामगारांनी प्रवेशद्वारावर घोषणाबाजी सुरू केल्याने त्यांना हटवण्यासाठी पोलिसांकडून सौम्य लाठीमार करण्यात आला.