| आगरदांडा | प्रतिनिधी |
गणेशोत्सव 19 सप्टेंबरला येत असून मुरुड तालुक्यातील गावोगावच्या गणेशमूर्ती बनविणाऱ्या चित्र शाळांमध्ये लगबग सुरु झाली असून मातीचे काम अंतिम टप्प्यात येताना दिसून येत आहे. सतत पडणारा पाऊस त्यात वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा अशा अनेक समस्यांच्या गर्तेत हा व्यवसाय सापडला आहे. केवळ कलेची असलेली आवड जोपासण्यापुरताच हा व्यवसाय उरलाअसल्याची खंत कारखानदार व्यक्त करत आहेत. तालुक्याच्या गावोगावी साठ ते सत्तर गणेश मूर्तीकारांच्या चित्रशाळा असून माती मळण्यापासून ते रंगकामापर्यंत त्यांना स्वतःसह कुटुंबियांना सर्व कामे करावी लागतात. चांगले कलाकार कामगार म्हणून मिळणे दुरापास्त झाले असले तरी गणेशमुर्तीच्या मातीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.
यंदा वाढत्या महागाईमुळे मूर्तींच्या किंमतीत वाढ होणार असून त्याचा फटका गणेशभक्तांवर पडणार आहे. शाडुच्या मातीच्या किमंतीत दहा टक्कयांनी वाढ, तर रंग साहित्य, व अन्य साहित्यांच्या किंमती भरमसाठ वाढल्या आहेत. त्यातच मजुरीच्या दरात वाढ झाली असली तरी मजुर मिळणे कठीण झाले आहे.
अच्युत चव्हाण, मुर्तीकार मुरुड







