। पाताळगंगा । वार्ताहर ।
पाताळगंगा येथील कॅस्ट्रॉल कंपनीमध्ये नोकरी मिळावी यासाठी कैरे येथील प्रकल्पग्रस्त शेतकर्यांची मुले दि. 16 ऑगस्ट रोजी उपोषणास बसणार आहेत. सदर बाबतीत विशेष वृत्त असे की, कैरे येथील गोविंद हाडकू पाटील, जगन्नाथ दामाजी पाटील,अनंता नामदेव पाटील यांची कॅस्ट्रॉल कंपनीच्या उभारणीत शेती गेली आहे. सदर प्रकल्पग्रस्तांना कंपनीने कामावर घेवून नंतर शिक्षण कमी असल्याचे कारण देत कामावरून कमी केले होते. व त्यावेळी भविष्यात तुमच्या वारसांना कंपनीत कामावर घेवू असे आश्वासनदिले होते परंतु वासुदेव गोविंद पाटील, सचिन अनंता पाटील यांनी कंपनीकडे नोकरीत सामावून घेण्यासाठी वारंवार अर्ज केला तरी कंपनीने त्यांना कामावर घेण्यास नकार दिला.
सध्या कंपनीमध्ये नोकर भरती सुरू आहे. या नोकरभरतीमध्ये बाहेरील तरूणांना सामावून घेतले जात आहे परंतु नोकरीसाठी आवश्यक असे आमचे शिक्षण असूनही आमच्यावर अन्याय होत आहे. त्यामुळे आपल्याला कामावर सामावून घेण्यासाठी प्रकल्पग्रस्तांची सुशिक्षित मुले दि. 16 ऑगस्ट रोजी कंपनी गेटसमोर साखळी उपोषण करणार आहेत. कामगार नेत्या श्रृती म्हात्रे हे त्यांचे नेतृत्व करणार असून स्थानिकांना नोकरभरतीत प्रथम प्राधान्य का दिले जात नाही याबाबत कैरे व आसपासच्या गावातील नागरिकांच्या चर्चेला उधाण आले असून स्थानिकांवर अन्याय होत असेल तर रसायनी पाताळगंगा परिसरातील इतर नागरिकही पाठिंबा देणार असल्याची चर्चा सुरू आहे.