| माणगाव | प्रतिनिधी |
माणगाव शहराच्या दोन्ही बाजूनी मुंबई-गोवा महामार्गालगत मोठ मोठी झाडेझुडपे मोठ्या प्रमाणात वाढली आहेत. त्यातच या मार्गावरील रस्त्याकडेला असणाऱ्या साईडपट्ट्या भरल्या नसल्याने अपघाताला निमंत्रण मिळत आहे. गोदनदी ते मुगवलीफाटा अंतरातील सुमारे 3 कि.मी. अंतरातील रस्त्याच्या दोन्ही बाजूनी साईडपट्ट्या भरल्या नाहीत. तसेच झाडेझुडपे वाढल्यामुळे दिवसेंदिवस अपघातात वाढ होत आहे. याकडे महामार्ग अधिकाऱ्यांनी अक्षम्य डोळेझाक चालवली आहे. या दरम्यान साईडपट्ट्या दोन्ही बाजूच्या भरल्यास महामार्गावरील वाहतूक कोंडीला आळा बसेल. तसेच रस्त्यालगत असणारी झाडे-झुडपे व गवत काढल्यास महामार्ग मोकळा श्वास घेईल व माणगावात गणेशोत्सव व होळी उत्सव काळात होणाऱ्या वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटेल. याबाबत माणगाव येथील सामाजिक कार्यकर्ते तथा व्यापारी विजय मेहता यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना माहिती दिली. माणगाव शहराच्या दोन्ही बाजूंनी साईडपट्ट्या शासनांनी गणेशोत्सवापूर्वी तात्काळ भराव्यात व रस्त्यालगत असणारी झाडे, झुडपे, फांद्या, गवत काढून टाकावे जेणे करून महामार्ग मोकळा श्वास घेईल व माणगाव बाजारपेठेतील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटेल, अशी मागणी विजय मेहता यांनी महामार्ग प्रशासनाकडे केली आहे.







