अनेक मतदार गायब, तर अनेकांचे दुसऱ्या प्रभागात स्थलांतर
| नागोठणे | वार्ताहर |
नागोठणे ग्रामपंचायत हद्दीतील सहा प्रभागांतील मतदारयाद्यांचे पुन:रिक्षण ग्रामपंचायत प्रशासनाकडून करण्यात आले. त्यानुसार या मतदारयाद्यांमध्ये काही दुरुस्ती करायची असल्यास त्यावर हरकती घेण्यासाठी याद्या नागोठणे ग्रामपंचायतीच्या सूचना फलकावर 10 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध करण्यात आल्या. मात्र, या याद्यांमध्ये अनेक मतदारांना वगळण्यात आले असून, अनेक मृत मतदारांची नावे मतदारयादीत अद्याप दिसून येत आहेत. तर अनेक मतदारांना त्यांच्या प्रभागातून उचलून अन्य प्रभागात स्थलांतरीत करण्यात आले आहे. अशा अनेक चुकांमुळे नागोठण्यातील मतदार पुन:रिक्षण कार्यक्रमात मतदारयाद्यांमध्ये सावळागोंधळ करण्यात आल्याने याबाबत उलटसुलट चर्चा सुरु आहे.
नागोठणे ग्रामपंचायतीची पंचवार्षिक मुदत 21 मे, 2023 रोजी संपल्याने सध्या ग्रामपंचायतीचा कारभार रोहा पंचायत समितीकडून प्रशासक म्हणून नियुक्त करण्यात आलेले ग्रामविस्तार अधिकारी एस.एन. गायकवाड हे चालवत आहेत. त्यांन सहकार्य करण्यासाठी नागोठणे ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक राकेश टेमघरे हे कार्यरत आहेत. असे असतानाही नागोठणे ग्रामपंचायतीच्या आगामी पंचवार्षिक निवडणुकीसाठी विधानसभेच्या पेण-191 मतदार संघातील नागोठणे ग्रामपंचायतीच्या मतदारयाद्यांचे पुन:रिक्षण करताना अनेक चुका यंत्रणेकडून झाल्याचे दिसून येत आहे.
वास्तविक पाहता नागोठणे ग्रामपंचायतीचे कर्मचारी घरपट्टी, पाणीपट्टी वसुली करण्यासाठी नागरिकांच्या घरोघरी जात असतात. त्यामुळे कोण कुठे राहतोय याची पक्की माहिती या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना असते. असे असतांनाही प्रभाग क्रमांक 3 मध्ये समाविष्ट असलेल्या येथील मोहल्ला भागातील सुमारे 80 ते 90 मतदारांना प्रभाग क्र. 2 मध्ये समाविष्ट करण्यात आले असल्याचे प्रभाग क्र. 3 मध्ये दोन वेळा सदस्य राहिलेले अखलाख पानसरे यांनी सांगितले. याबाबत आपण रोहे तहसीलदारांकडे सक्त हरकत घेतली असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच येथील प्रभाग क्र. 1 मधील नागरिक हरीश्चंद्र पांडुरंग टके व संतोष सोमाजी इप्ते यांचे नाव मतदार यादीतून वगळण्यात आले आहे. तर ग्रामपंचायतीमध्ये दोन वेळा सदस्य राहिलेल्या राजश्री हरीश्चंद्र टके यांचे नाव मतदारयादीत राजश्री पांडुरंग टके असे चुकीचे आले आहे. हयात मतदारांच्या बाबतीत अशा अक्षम्य चुका झालेल्या असतांनाच अनेक मृत मतदारांना त्यांच्या मृत्यूनंतरही मतदार यादीत राखून ठेवण्याचा पराक्रम यंत्रणेकडून करण्यात आला आहे. जसे की, प्रभाग क्र. 6 मधील रामचंद्र लक्ष्मण टके व त्यांच्या पत्नी नीरा रामचंद्र टके यांच्या मृत्यूला अनुक्रमे 10 व 4 वर्षे झालेली असताना तसेच प्रभाग क्र. 1 मधील वसंत मोरे, नवीन सोष्टे, महादेव इप्ते व इतर प्रभागांतील अनेक मतदार मृत झालेले असताना यादी पुन:रिक्षण कामात त्यांना वगळण्यात आलेले नाही. त्यामुळे गावात सर्वत्र फिरणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या तसेच शासनाचा रग्गड पगार घेऊनही मतदार नोंदणी कामाचे वेगळे मानधन घेणाऱ्या बी.एल.ओ. म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या शिक्षकांच्या ही बाब लक्षात आली नाही का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
मतदानयादीतून माझे नाव वगळण्यात आले आहे. येत्या ग्रामपंचायत निवडणुकीत माझे नाव मतदार यादीत आले नाही व मला मतदानापासून वंचित राहावे लागले तर मी माझ्या प्रभागातील मतदान केंद्राबाहेर आत्मदहन करेन.
संतोष इप्ते
आमच्याकडे उपलब्ध झालेल्या 1 जून, 2023 च्या यादीनुसार नागोठण्यातील मतदारयाद्या असून, त्यावर आलेल्या हरकतींनुसार दुरूस्ती करण्याचे काम सुरु आहे.
किशोर देशमुख, तहसीलदार रोहा