| रेवदंडा | प्रतिनिधी |
अलिबाग शहरातील नागरिकांसाठी महत्त्वाची मानली जाणारी श्रीबाग येथील वैकुंठधाम (स्मशानभूमी) अत्याधुनिक सुविधा, स्वच्छ परिसर आणि सुधारित पायाभूत सुविधांसह नव्या रूपात सज्ज झाले असून ते नागरिकांच्या सेवेसाठी खुले करण्यात आले आहे. अलिबाग नगरपालिकेच्या वीज व बांधकाम सभापती प्रशांत नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली नूतनीकरणाची कामे पूर्ण करण्यात आली.
नूतनीकरणानंतर आयोजित लोकार्पण सोहळ्यात नगराध्यक्षा अक्षया नाईक, उपनगराध्यक्षा ॲड. मानसी म्हात्रे, मुख्याधिकारी, वीज व बांधकाम सभापती प्रशांत नाईक, विविध सभापती, नगरसेवक आणि नगरसेविका उपस्थित होत्या. मान्यवरांच्या हस्ते वैकुंठधामाचे लोकार्पण करून ते नागरिकांना समर्पित करण्यात आले.
या प्रकल्पांतर्गत परिसराची स्वच्छता, आवश्यक बांधकाम दुरुस्ती, मूलभूत सुविधांची उभारणी, सुशोभीकरण तसेच अंत्यविधीसाठी आवश्यक सुविधा विकसित करण्यात आल्या आहेत. त्यामुळे संपूर्ण परिसर अधिक प्रशस्त, स्वच्छ आणि सुसज्ज झाला आहे.
यावेळी बोलताना प्रशांत नाईक यांनी सांगितले की, शहराच्या सर्वांगीण विकासाबरोबरच नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित सुविधा दर्जेदार करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. वैकुंठधामाचे नूतनीकरण पूर्ण होणे ही समाधानाची बाब असून, नागरिकांना सन्मानजनक सुविधा उपलब्ध करून देण्याचा पालिकेचा प्रयत्न असल्याचे त्यांनी नमूद केले.
श्रीबाग वैकुंठधामाच्या नूतनीकरणामुळे अंत्यसंस्कारावेळी नागरिकांना होणाऱ्या गैरसोयी कमी होणार असून, स्वच्छ, सुरक्षित आणि सन्मानपूर्वक वातावरणात अंतिम विधी पार पाडण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. या उपक्रमामुळे अलिबाग नगरपालिकेच्या नागरिकाभिमुख विकासकामांना आणखी बळ मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे.





