| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
सर्वसामान्यांचे प्रश्न परखडपणे मांडणारे, शेतकरी, कामगार आणि अन्यायग्रस्तांच्या पाठीशी उभे असणारे रायगड जिल्ह्यातील अग्रगण्य वृत्तपत्र दैनिक कृषीवलचा 90 वा वर्धापन दिन रविवारी (दि.7) अलिबागमध्ये साजरा केला जाणार आहे. या निमित्ताने जिल्ह्यातील पत्रकारांचा सन्मान करण्यात येणार असल्याची माहिती संपादक माधवी सावंत यांनी दिली.
स्वातंत्र्यपूर्व काळात शेतकरी, कष्टकरी, कामगार व अन्यायग्रस्तांच्या प्रश्नांना आवाज देण्यासाठी 7 जून 1937 मध्ये शेतकऱ्यांचे नेते दिवंगत नारायण नागू पाटील यांनी कृषीवल वृत्तपत्राची स्थापना केली. कृषीवलच्या माध्यमातून तळागाळातील घटकाला बातमीच्या रुपात न्याय देण्याचा प्रयत्न आजपर्यंत करण्यात आला आहे. रस्ता, पाणी असे अनेक प्रश्न परखडपणे मांडून जनतेचा आवाज बनण्याचे काम कृषीवलच्या माध्यमातून करण्यात आले आहे. कृषीवलचा 90 वा वर्धापन रविवारी (दि.7) साजरा करण्यात येणार आहे. साध्या पध्दतीने हा सोहळा साजरा केला जाणार असल्याची माहिती कृषीवलच्या कार्यकारी संपादिका माधवी यांनी दिली आहे.






