उपोषणाचा आज नववा दिवस; शरीरातील पाणी पातळी कमी
। जालना । वृत्तसंस्था ।
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांचा लढा सुरु आहे. जरांगेंच्या उपोषणाचा आज नववा दिवस आहे. दरम्यान डॉक्टरांनी त्यांना तपासून त्यांना सलाईन लावली आहे. त्यांना घशात इन्फेक्शन आणि शरीरात ताकद राहिली नसल्याने जरांगेंना नीट बोलताही येत नाही. जरांगे यांची तब्येत बिघडल्याची माहिती मिळताच वैद्यकीय अधिकाऱ्यांचे पथक उपोषणस्थळी हजर झाले आहे. त्यांनी जरांगे यांना सलाईन लावत त्यांच्यावर प्राथामिक उपचार सुरू केले.
आंदोलक आणि पोलिसांमध्ये उद्भवलेल्या संघर्षानंतर सरकारने नेमलेल्या चौकशी समितीमधील अप्पर पोलीस महासंचालक संजय सक्सेना औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक ज्ञानेश्वर चव्हाण आणि जालना जिल्ह्याचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी आंदोलनस्थळी भेट घेतली. मनोज जरांगे यांच्याशी बातचीत केली. दरम्यान आंदोलकांवरती दाखल झालेले गुन्हे लाठीमार यासंबंधी मनोज जरांगे आणि पोलीस अधिकाऱ्यांमध्ये चर्चा झाली.
यावेळी त्यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. ‘सरकारने माझा जीवच घ्यायंच ठरवलंय, दोन वर्षे मी सरकारसोबत तहच करतोय, त्यांनी आमच्या पदरात काहीच टाकलं नाही. राज्य सरकारच्या मनात काय चाललंय, हे माहित नाही, आम्ही फक्त आशेवर आहोत, असं ते बोलताना म्हणाले आहेत.