| माणगाव | सलीम शेख |
माणगाव तालुक्यातील कळमजे येथील 22 वर्षीय ऋतिक संजय वाढवळ हा तरुण शेतात काम करत होता. अचानक त्यांचे लक्ष नसताना त्याला सर्पाने दंश केल्याने त्यास तातडीने उपचाराकरिता माणगाव उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (दि. 5) घडली. या घटनेची माहिती मिलिंद वसंत वाढवळ (वय-38, रा. कळमजे ता. माणगाव) यांनी पोलीस ठाण्यात दिली.
माणगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार ऋतिक संजय वाढवळ (वय-22, रा. कळमजे ता. माणगाव) हा त्याच्या शेतामध्ये काम करीत होता. यावेळी विषारी सापाने त्यास दंश केल्याने त्याला उपचाराकरिता माणगाव उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी माणगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्य्क फौजदार निमकर अधिक तपास करीत आहेत.
दरम्यान, ऋतिक वाढवळ हा माणगावमध्ये पाण्याचे जार टाकण्याचेही काम करीत असल्याने तो अनेकांच्या परिचयाचा होता. सर्पदंशाने निधन झाल्याची माहिती समजताच भाजपच्या पंचायतराज व ग्रामविकास कोकण विभाग संयोजिका शर्मिला सत्वे यांनी तसेच कळमजे गावातील ग्रामस्थांनी व पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी माणगाव उपजिल्हा रुग्णालयात धाव घेऊन ऋतिक वाढवळ याच्या नातेवाईकांचे सांत्वन केले. ऋतिक वाढवळ याच्यावर कळमजे येथील स्मशानभूमीत मंगळवारी अंत्यसंस्कार करण्यात आले.