मशागतीच्या कामांना वेग; पावसाळ्यापूर्वी शेती सज्ज
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
पावसाळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने रायगड जिल्ह्यातील शेतकरी कामाला लागले आहेत. जिल्हाभर मशागतीच्या कामांना वेग आला असून शेतात लगबग सुरू झाली आहे. बांधबंदिस्ती करणे, राब जाळणे, शेतातील पाला-पाचोळा गोळा करणे, गवत काढणे आदी कामे सध्या युद्धपातळीवर सुरू आहेत. पावसाळ्यापूर्वी ही सर्व कामे पूर्ण करण्यासाठी शेतकरी दिवसरात्र मेहनत घेताना दिसत आहेत.
रायगड जिल्ह्यात भात हे मुख्य पीक असून, त्यासोबत फळपिके व भाजीपाला लागवडही मोठ्या प्रमाणात केली जाते. सुवर्णा, जया, कर्जत, रत्ना या भाताच्या जातींची लागवड अधिक प्रमाणात केली जाते. जिल्ह्यातील सुमारे 97 टक्के शेतकरी पावसावर अवलंबून असून, अंदाजे 95 हजार हेक्टर क्षेत्रावर भातशेती केली जाते. मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच तापमानात वाढ झाल्याने शेतकऱ्यांना उन्हाचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे अनेक शेतकरी पहाटे आणि सायंकाळीच शेतात काम करण्यास प्राधान्य देत आहेत. दरम्यान, काही भागांत अवकाळी पावसाचा धोका लक्षात घेऊन काही शेतकऱ्यांनी मशागतीची कामे आधीच पूर्ण केली आहेत, तर काहींनी पेरणीसाठी लागणाऱ्या भात बियाण्यांची तयारी सुरू केली आहे. पुढील पंधरा दिवसांत बहुतांश कामे पूर्ण होतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
मान्सूनची चाहूल लागली आहे. पाऊस कधीही सुरू होऊ शकतो, त्यामुळे मशागतीची कामे वेगाने सुरू केली आहेत. काही ठिकाणी कामे पूर्ण झाली आहेत, तर काही ठिकाणी सुरू आहेत. उन्हाचा त्रास होत असल्याने पहाटे किंवा सायंकाळीच शेतात काम करावे लागते. लवकरच सर्व कामे पूर्ण होतील.
महेश जाधव,
शेतकरी







