मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती
| रायगड | प्रतिनिधी |
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील बहुचर्चित ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. हा कार्यक्रम शुक्रवार, दि. 1 मे रोजी पार पडला. यावेळी फडणवीस यांनी हा प्रकल्प केवळ रस्ता नसून, भारतीय अभियांत्रिकीचा जागतिक दर्जाचा नमुना असल्याचे सांगितले. “मिसिंग लिंक नव्हे, तर ‘कनेक्टिंग लिंक’ म्हणणे अधिक योग्य,” असेही स्पष्ट केले.
या प्रकल्पामुळे खोपोली ते कुसगावदरम्यानचे अंतर सुमारे 6 किमीने कमी होणार असून, प्रवासाचा 25 ते 30 मिनिटांचा वेळ वाचणार आहे. तसेच राज्याच्या अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळणार असल्याचा दावा त्यांनी केला.प्रकल्पात अत्याधुनिक सुरक्षा सुविधा देण्यात आल्या आहेत. बोगद्यांमध्ये अग्निशमन यंत्रणा, वॉटर मिस्ट सिस्टम, दर 50 मीटरवर आपत्कालीन फोन आणि दर 300 मीटरवर ‘कनेक्टर्स’ची व्यवस्था करण्यात आली आहे. संपूर्ण मार्गावर सीसीटीव्ही आणि इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम कार्यरत असेल.
या उद्घाटनप्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे, रोजगार हमी मंत्री भरत गोगावले आदी मान्यवर उपस्थित होते.सुमारे 7 हजार कोटी रुपयांचा हा प्रकल्प कठीण भौगोलिक परिस्थितीत पूर्ण करण्यात आला आहे. यात दोन बोगदे, व्हायाडक्ट आणि टायगर व्हॅलीतील केबल-स्टेड पूल यांचा समावेश आहे. या मार्गामुळे घाटातील अपघातप्रवण वळणे टाळली जाणार असून, प्रवास अधिक सुरक्षित होणार आहे. या ‘कनेक्टिंग लिंक’मुळे मुंबई-पुणे प्रवास सुसाट होण्यासोबतच उद्योग, व्यापार आणि पर्यटनाला मोठी चालना मिळणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.






