पावसाची सुट्टी संपली; जिल्ह्यात पुन्हा सक्रीय; 9 आणि 10 सप्टेंबर रोजी यलो अलर्ट
| रायगड | खास प्रतिनिधी |
बऱ्याच कालावधीनंतर मान्सून पुन्हा एकदा सक्रीय झाला आहे. जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी पाऊस जोरदार बरला. पोलादपूर-महाबळेश्वर आणि दिघी-कुडगाव रस्त्यावर दरड कोसळ्याची घटना घडली. काही कालावधीसाठी वाहतुक ठप्प झाली होती. 8 सप्टेंबर रोजी जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे, तर 9 आणि 10 सप्टेंबर रोजी यलो अलर्ट असल्याने पुढील दोन दिवस पावसाचे राहणार आहेत. पाऊस बरसल्याने बळीराजा सुखावला आहे.
ऑगस्ट महिन्यात पाऊस चांगलाच रुसला होता. काही तुरळक सरी वगळता पावसाने दांडी मारल्याने शेतातील पिक संकटात सापडल्याने बळीराजा चिंतातूर झाला होता. शेतातील पिक करपुन त्याच्यावर रोगाचा प्रार्दुभाव होण्याची शक्यता निर्माण झाली होती. आधीच मान्सून उशिराने दाखल झाल्याने शेतीच्या कामांना विलंब झाला होता. 5 सप्टेंबर पासून राज्याच्या विविध भागांमध्ये मान्सून पुन्हा सक्रीय होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यानुसार 7 सप्टेंबरपासून जिल्ह्यात पावसाला सुरवात झाली आहे. पुढील दोन दिवस जिल्ह्याला यलो अलर्ट देण्यात आला आहे. पाऊस चांगला बरसत असल्याने शेतीला पाणी मिळाल्याने बळीराजा समाधानी असल्याचे दिसून येते. अलिबाग, पेण, पनवेल, कर्जत, खालापूर, खोपोली, मुरुड तळा या ठिकाणी पाऊस चांगला बरसला. जोरदार पावसामुळे शहरातील सकल भागांमध्ये पाणी साठले होते. गेल्या दोन दिवसांपासून सूर्य दर्शन झालेले नाही. काळ्या ढगांनी आकाश झाकलेले आहे. अचानक पाऊस मुसळधार बरसत असल्याने सर्वांचिच धावपळ उडत असल्याचे चित्र आहे.
सतत पाऊस पडत असल्याने मुंबई-गोवा महामार्गावरील खड्यातून वाट काढणे वाहन चालकांना कठीण झाले होते. अद्यापही एक लेनचे काम पूर्ण झालेले नाही. रस्त्यावरील खड्डयांमुळे वाहनांची गती धिमी झाली होती. दोन दिवस पडणाऱ्या पावसामुळे वातावरणात देखील चांगलाच गारवा आला आहे. गेल्या 24 तासात जिल्ह्यात सरासरी 80 मिमी पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिक 84 मिमी पाऊस कर्जत तालुक्यात झाला आहे, त्या खालोखाल पनवेल-78 मिमी, खालापूर-72 मिमी, म्हसळा 67 मिमी, तर सर्वात कमी 21 मिमी पावसाची नोंद अलिबाग तालुक्यात झाली आहे.
हवामानात बदल झाल्याने रात्री सात ते अकरा वाजेपर्यंत जिल्ह्यासाठी रेड अलर्ट देण्यात आला असल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली. या कालावधीत जोरदार पाऊस बरसणार असल्याने नागरिकांनी सतर्क राहावे त्याच प्रमाणे सर्व यंत्रणांनी देखील दक्ष राहण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाने केल्या आहेत.