असे प्रकार वारंवार घडत असल्याचा ग्रामस्थांचा आरोप
| उरण | वार्ताहर |
शुक्रवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास उरण ओएनजीसी प्रकल्पामधून कच्च्या तेलाची मोठ्या प्रमाणात गळती झाली. सदर गळती ही मांगीन देवी मंदिराला लागून असणाऱ्या नाल्यातून एचआय गळती झाली असून, या तेलाचा प्रचंड तवंग येथील नाल्यासह समुद्राच्या पाण्यावर पसरला आहे. त्यामुळे तेलाचा वास येथील परिसरामध्ये पसरला होता. असे प्रकार कंपनीकडून वारंवार होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी करून याकडे वेळीच लक्ष दिले नाहीतर उरणची भोपाळपेक्षाही भयानक परिस्थिती होईल, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. याबाबत शासकीय यंत्रणेला देऊनही कोणताच अधिकारी घटनास्थळी आलेला दिसत नाही, असे ग्रामस्थांनी सांगितले.
पहाटे तेल गळती झाल्याचे लक्षात येताच प्रकल्पाकडून नाल्यातून समुद्रामध्ये मिसळणारे तेल थांबावण्याचा प्रयत्न सुरु करण्यात आला आहे. तर किनाऱ्यावर आलेल्या तेलाचा जाड थर जमा करण्यासाठी उरण ओएनजीसी प्रकल्पामधून होणारी तेलगळती थांबविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. किनाऱ्यावर आलेला तेलाचा जाड थर जमा करण्यासाठी कर्मचाऱ्यांसह सक्शन पंप, ड्रम, सक्शन वॅन घटनास्थळी कार्यरत झाल्या आहेत. दरम्यान, येथील नाल्यातून बाहेर येणारे तेल येथील पिकत्या शेतजमिनीमध्ये जात असल्याने, शेतपिकाचे नुकसान होणार असल्याचा दावा येथील शेतकरी करत आहेत. तर, समुद्राच्या पाण्यामध्ये तेल मिसळल्याने किनारी भागावरील मासे आणि तत्सम जीव धोक्यात आले आहेत. तर यावर उदरनिर्वाह करणाऱ्या नागरिकांनाही याचा फटका बसणार आहे.
सदरचे काम हे काही दिवसांपूर्वी ठेकेदाराला वर्ग करण्यात आले आहे, त्यामुळे ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे ही घटना घडल्याची माहिती कंपनीच्या कामगारांनी नाव न छापण्याच्या अटीवर दिली. सदर कंपनीमध्ये सरकार नावाचा ठेकेदार कामगारांना कोणतीच सुरक्षा अथवा पगार वेळेवर देत नसल्याची माहिती कामगारांनी दिली. तरी कंपनी प्रशासन व शासकीय यंत्रणेने याची वेळीच दखल घ्यावी अन्यथा त्याचे दुष्परिणाम येथील स्थानिक जनतेला भोगावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.