| उरण | प्रतिनिधी |
जेएनपीटी बंदर येथे 14 कंटेनरमधून आलेली 32 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीची सुमारे 371 मेट्रिक टन सुपारी महसूल गुप्तचर संचालनालय विभागाने जप्त केली आहे. या प्रकरणात खोट्या सुमारे 36 कोटी रुपयांचा कर चुकवण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याचे समोर आले आहे. आतापर्यंतची ही सर्वात मोठी जप्ती असल्याचे बोलले जात आहे.
जेएनपीए बंदरातून कॅल्शियम नायट्रेटच्या बनावट नावाने तीन लाख 71 हजार 90 किलो तस्करी करण्यात येत असलेल्या 32 कोटी रुपयांच्या सुपारी जप्त केल्या आहेत. भारतातील सुपारी तस्करीची सर्वात मोठी जप्ती असल्याचे डीआरआय अधिकाऱ्यांनी सांगितले.
डीआरआय विभागाला खात्रीशीर गुप्त माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तपास केला असता कॅल्शियम नायट्रेटच्या बनावट नावाने आयात करण्यात आलेल्या सुपारीचे 14 कंटेनरचा साठा हाती लागला. तीन लाख 71 हजार 90 किलो तस्करीच्या मार्गाने आयात करण्यात आलेला 32 कोटी रुपयांच्या सुपारीचा साठा त्यांनी जप्त केला आहे. कस्टम ड्युटी चुकवण्याच्या प्रयत्नातून हा गुन्हा केल्याचा प्रकार उघडकीस आला असल्याची माहिती डिआरआय अधिकाऱ्यांनी दिली.
गुप्त माहितीच्या आधारावर, महसूल गुप्तचर संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी 31 ऑगस्ट रोजी कारवाई करुन जवाहरलाल नेहरु बंदरात सुपारी असलेले कंटेनर्स ताब्यात घेतले. तळेगाव येथील आंतरदेशीय कंटेनर डेपो येथे पाठवण्यात येणार असलेल्या या कंटेनर्समध्ये सुपाऱ्या लपविल्याचा संशय आल्याने अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली.
तळेगाव येथील डेपोमध्ये पोहोचण्यापूर्वीच हे कंटेनर चोरण्यात येतील किंवा बदलले जाऊन दुसऱ्या मार्गाने पाठवण्यात येतील, असा संशय अधिकाऱ्यांना होता. या कंटेनरमध्ये 32.31 कोटी रुपये किमतीची 3,71,090 किलो (371 मेट्रिक टन) सुपारी जप्त करण्यात आल्याचे महसूल संचालनालयाच्या निवेदनात म्हटले आहे. फोडलेल्या सुपाऱ्यांवर त्यांच्या एकूण किमतीच्या 110 टक्के आयात शुल्क लागू आहे. त्यामुळे या प्रकरणामध्ये अंदाजे 36 कोटी रुपयांचे सीमा शुल्क बुडवण्याचा प्रयत्न झाला होता. या प्रकरणाचा तपास सुरु असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.
याआधी ऑगस्ट महिन्यामध्ये देखील अशाच प्रकारची कारवाई करण्यात आली होती. महसूल गुप्तचर संचालनालयाने जेएनपीटी येथे मुख्य सूत्रधारासह पाच जणांना अटक करुन सुपारीच्या तस्करीचा पर्दाफाश केला होता. न्हावा-शेवा येथे दोन वेगळ्या कंटेनरमधून सुमारे 4.40 कोटी रुपये किमतीचे सुमारे 50 टन सुपारी काजू जप्त केले होते.