सरकार बदलले मात्र काम रखडलेलेच
| श्रीवर्धन | वार्ताहर |
रेवस ते रेड्डी या सागरी महामार्गामध्ये समाविष्ट असलेला बागमांडला ते बाणकोट हा बाणकोट खाडीवरील पूल गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या अवस्थेत आहे. सरकार बदलली मात्र या पुलाच्या कामांकडे फारसे कोणी लक्ष देत नाही. प्रवाशांची होणारी गैससोय टाळण्यासाठी काम लवकरातलवकर पूर्ण करावे अशी मागणी जोर धरत आहे. छगन भुजबळ राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना या पुलाचे भूमिपूजन करण्यात आले होते. अंदाजे 2008 ते 9 या वर्षांमध्ये या कामाला सुरुवात झाली होती. परंतु सातत्याने पुलाचा वाढत जाणारा खर्च व बजेटमध्ये असणारी तरतूद यातील फरकामुळे सदर ठेकेदाराने हे काम सोडून दिले. बागमांडला ते बाणकोट दरम्यान पिलर चे काम पूर्ण झाले असून त्यावर गर्डल टाकण्याचे काम बाकी आहे. या पुलाचे काम पूर्ण झाल्यास रायगड व रत्नागिरी जिल्हा जोडला जाणार आहे. पुण्यावरून श्रीवर्धन कडे येणार्या पर्यटकांना केवळ 160 किलोमीटर अंतर कापावे लागते. सदर पुलाचे काम पूर्ण झाल्यास गणपतीपुळे येथे जाण्यासाठी सगळ्यात कमी अंतराचा मार्ग म्हणून या मार्गाकडे पाहिले जाईल. सध्या या ठिकाणी फेरीबोटची सुविधा उपलब्ध असली तरीही अनेक वेळा पर्यटकांना फेरीबोट येईपर्यंत तासंतास वाट बघावी लागते. त्यामुळे प्रवासाचे अंतर कमी होत असले तरी प्रवासाचा वेळ मात्र खूप मोठ्या प्रमाणात वाया जातो.
सदर पुलाचे काम पूर्ण झाल्यास श्रीवर्धन ते रत्नागिरी किंवा दापोली या परिसरात एसटी बस सेवा देखील सुरू होऊ शकते. जेणेकरून प्रवाशांना आपला प्रवास सुखकर करता येईल. श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर, श्रीवर्धन, हरिहरेश्वर हे समुद्रकिनारे व मंदिरे पाहण्यासाठी असंख्य पर्यटक या ठिकाणी येत असतात. याच पर्यटकांना दापोली तालुक्यातील समुद्रकिनारे, गुहागर तालुक्यातील समुद्रकिनारे पाहून गणपतीपुळे सुध्दा या मार्गामुळे पाहण्यासाठी सोपे जाणार आहे. मात्र आजपर्यंत राज्यात आलेल्या कोणत्याही सरकारने या पुलाच्या पूर्णत्वाकडे गांभीर्याने लक्ष दिलेले नाही. त्यामुळे सदर पुलाचे काम रखडलेले आहे. नुकतीच रेवस ते रेड्डी सागरी मार्गासाठी भूसंपादनाच्या सर्वे नंबर ची यादी देखील प्रसिद्ध करण्यात आली होती. जर का या महामार्गाबाबत सरकार एवढ्या मोठ्या प्रमाणात सकारात्मक आहे. तरी या पुलाचे काम का पूर्ण होत नाही? असा प्रश्न या ठिकाणचा स्थानिक नागरिक विचारत आहे. सदर पुलाच्या बांधकामाची अवस्था मुंबई गोवा महामार्गाच्या कामासारखीच झाली असल्याचे पाहायला मिळत आहे. तरी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण या पुलाचे बांधकाम तातडीने पूर्णत्वाकडे नेण्यासाठी प्रयत्न करतील का? असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.