कोट्यवधींच्या सुविधा मात्र मनुष्यबळाची कमतरता
| रायगड | आविष्कार देसाई |
एक कालावधी असा होता की अलिबागच्या सरकारी रुग्णालयामध्ये विविध प्रकारची यंत्रसामुग्रीची उपलब्ध झाली असली, तरी मनुष्यबळाची कमतरता भासत आहे. लवकरच पदभरतीचा बूस्टरडोस जिल्हा सरकारी रुग्णालय मिळणे अत्यंत गरजेचे झाले आहे. अन्यथा कोट्यवधी रुपयांची यंत्रसामग्री तशीच धूळखात पडणार आहे.
अलिबाग येथील जिल्हा सरकारी रुग्णालयामध्ये दररोज सुमारे 200 हून अधिक रुग्ण ओपीडीमध्ये येत असतात. सुरुवातीला या रुग्णालयामध्ये सीटीस्कॅन मशीन, एक्स रे मशीन, सोनोग्राफी, व्हेंटीलेटर, अद्यावत प्रयोग शाळा, विविध प्रकारची औषधे यांची कमतरता होती. कालांतराने त्यामध्ये आता सुधारणा झाल्याने रुग्णांना येथे उपचार घेणे सोयीचे झाले आहे. मात्र या ठिकाणी डॉक्टर, नर्स, क्लार्क, तंत्रज्ञ, वॉर्डबॉय यांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे ठराविक मनुष्यबळावरच ताण येत आहे. वर्ग-3 आणि वर्ग-4 ची 136 पद रिक्त आहेत. वर्गची-1ची पद रिक्त आहेत, तसेच अतिरीक्त जिल्हा शल्य चिकित्सक हे पद देखील रिक्त आहे. कंत्राटी पध्दतीने काही रिक्त पदांचा भार हलका करण्यात आला आहे.
…तर रुग्णांना मोठा आधार जिल्हा सरकारी रुग्णालयामधील लिफ्ट अधूनमधून बंद असते. त्यामुळे रुग्णांना त्याचा त्रास होतो. प्रामुख्याने गरोदर माता, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक यांना अधिक त्रास सहन करावा लागतो. शवागारातील अस्वच्छतेमुळे दुर्गंधी पसरून परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो. अलिकडे काही चांगल्या सुधारणा झाल्या आहेत. जिल्हा सरकारी रुग्णालयामध्ये सिटीस्कॅन मशीन बसवण्यात आले आहे. त्यामुळे रुग्णांची चांगलीच सोय होत आहे. खासगी रुग्णालायामध्ये सिटीस्कॅनसाठी अडीच ते तीन हजार रुपये मोजावे लागतात. अद्ययावत प्रयोगशाळा निर्माण केल्याने विविध रिपोर्ट तातडीने आणि कमी खर्चात उपलब्ध होत आहे. कॅन्सरची प्राथमिक अवस्था कळावी, यासाठी सुमारे 60 लाख रुपयांची यंत्र सामुग्री लावण्यात आली आहे. त्यामुळे रुग्णांची चांगलीच सोय होत आहे. पदभरती झाल्यास सेवांचा दर्जा वाढू शकेल.
जिल्हा सरकारी रुग्णालयमध्ये मनुष्यबळाची कमतरता आहे. पदांची भरती करण्याबाबत सरकारला वेळोवेळी कळवण्यात येते. सध्या सर्व सोयी रुग्णालयामध्ये आहेत. राज्य सरकारने राज्यभरात तब्बल 14 हजार पदांची भरती करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे.
डॉ. देवमाने, जिल्हा शल्यचिकीत्सक, रायगड