| माणगाव | सलीम शेख
माणगावमध्ये 6 हजार रुपयांची लाच स्विकारताना उपकोषागार अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने रंगेहाथ पकडले. ही घटना शुक्रवारी (दि.15) दुपारी दोनच्या सुमारास घडली. मिळालेल्या माहितीनूसार, सेवानिवृत्तीनंतर सुधारित ग्रॅज्युटीच्या फरकाची रक्कम देण्यासाठी सहा हजार रुपये लाचेची रक्कम स्वीकारताना मणगाव उपकोषागार कार्यालयातील अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.
मारुती रामचंद्र पवार (वय 56 रा. रूप राज बिल्डिंग, बी विंग, दुसरा मजला, रूम नंबर 202, रोहा एक्सल कॉलनीजवळ ता. रोहा जि. रायगड) असे लाच घेताना पकण्यात आलेल्या उपकोषागार अधिकाऱ्याचे नाव आहे.
याबाबत 62 वर्षीय महिलेने रायगड एसीबीकडे बुधवारी (दि.13) तक्रार केली होती. तक्रारदार हे सेवानिवृत्त कर्मचारी आहेत. निवृत्तीनंतरचे सुधारित ग्रॅज्युटी फरकाची 45 हजार रुपयांच्या रकमेचे बिल मंजूर करून बँक खात्यात जमा करण्याची मंजुरी देण्याकरता मारुती पवार हे 6 रुपये लाच मागत असल्याची तक्रार महिलेने रायगड एसीबीकडे केली.
तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीची गुरुवारी (दि.14) पडताळणी केली असता उपकोषागार अधिकारी मारुती पवार यांनी पंचासमक्ष 6 हजार रुपये लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग रायगड यांनी सापळ्याचे आयोजन केले. मारुती पवार यांना शुक्रवारी सापळा कारवाईदरम्यान तक्रारदार यांच्याकडून 6 हजार रुपये लाचेची रक्कम स्वीकारताना उपकोषागार कार्यालय माणगाव येथे रंगेहाथ पकडण्यात आले.
ही कामगिरी ठाणे परिक्षेत्र पोलिस अधीक्षक सुनिल लोखंडे,अप्पर पोलीस अधीक्षक अनिल घेरडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड अलिबाग एसीबी पोलीस उपाधीक्षक शशिकांत पाडावे, पोलीस निरीक्षक नवनाथ चौधरी, पोलीस अंमलदार विनोद जाधव, शरद नाईक, महेश पाटील, सचिन आटपाडकर यांच्या पथकाने केली.