। मुंबई । वृत्तसंस्था ।
महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेच्या घटनादुरुस्तीचे अंतिमीकरण आणि मंजुरी 21 सप्टेंबरला सह्याद्री अतिथीगृहात होणार्या प्रत्यक्षदर्शी विशेष सर्वसाधारण सभेत होणार आहे. मंगळवारी झालेल्या ऑनलाइन विशेष सर्वसाधारण सभेतील घटनादुरुस्तीला अनेक जिल्हा संघटनांनी विरोध केल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला.
राज्य कबड्डी संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी कार्यकारिणी समिती आणि विशेष सर्वसाधारण अशा दोन सभा घेण्यात आल्या. या वेळी जिल्हा संघटनांच्या प्रतिनिधींनी ऑनलाइन सभेऐवजी प्रत्यक्षदर्शी सभेत घटनेवर चर्चा व्हावी, ही मागणी केली. त्यानुसार पवार यांनी पुढील महिन्यात गणेशोत्सवानंतर प्रत्यक्षदर्शी सभेची घोषणा केली. भारतीय हौशी कबड्डी महासंघाच्या घटनेनुसार राज्य कबड्डी संघटनेच्या घटनेतही काही बदल अपेक्षित आहेत. त्यामुळे ही घटनादुरुस्ती आवश्यक आहे, असे संघटनेच सरकार्यवाह अॅड. आस्वाद पाटील यांनी सांगितले. या सभेमध्ये गेली अनेक वर्षे न होऊ शकलेल्या महाकबड्डी लीगवर चर्चा करण्यात आली. महाकबड्डीच्या पुनरुज्जीवनासाठी राज्य संघटना प्रयत्नशील आहे, अशी माहिती राज्य कबड्डी संघटनेच्या सूत्रांनी दिली.