| पनवेल | वार्ताहर |
मोटारसायकलवरून आलेल्या दोघा लुटारूंनी गणेश दर्शन घेऊन रिक्षामधून पतीसह घरी परतत असलेल्या विवाहितेच्या गळ्यातील 96 हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र व बोरमाळ खेचून पलायन केल्याची घटना तळोजा येथे घडली. विशेष म्हणजे या घटनेतील लुटारूंनी रिक्षाचालक असलेल्या या विवाहितेच्या पतीच्या तोंडावर मिरचीपूड टाकून पलायन केल्याचे उघडकीस आले आहे.
तळोजा पोलिसांनी या लुटारूंविरोधात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला आहे. या घटनेतील तक्रारदार सुनीता काशीनाथ पाटील (40) या तळोजा पाचनंद येथे राहण्यास असून त्यांचे पती तळोजा परिसरात रिक्षा चालवतात. सायंकाळच्या सुमारास पाटील दाम्पत्य आपल्या रिक्षातून पनवेलमधील चिंध्रण गावात राहणाऱ्या नातेवाईकांकडे गणेश दर्शनासाठी गेले होते. गणेश दर्शन झाल्यानंतर पाटील दाम्पत्य आपल्या रिक्षाने तळोजा येथे जाण्यासाठी निघाले होते. यावेळी कुतरपाडा येथे जाण्याचा रस्ता विचारण्याचा बहाणा केला. यावेळी मोटारसायकलवरील दुसऱ्या लुटारूने संधी साधून रिक्षामध्ये पाठीमागे बसलेल्या पत्नीच्या गळ्यातील मंगळसूत्र व बोरमाळ खेचून उलट्या दिशेने पलायन केले. या प्रकारानंतर पाटील दाम्पत्याने तळोजा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.