प्रणॉयच्या दुखापतीने सुवर्णपदक हुकले; अंतिम सामन्यात चीनकडून पराभव
| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
भारतीय पुरुष बॅडमिंटन संघाने हांगझाऊ आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक गमावले आहे. अंतिम फेरीत त्याचा सामना बलाढ्य चीनशी झाला. त्यांनी अंतिम फेरीत भारताचा 3-2 असा पराभव केला. भारताला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. टीम इंडियाने तब्बल 37 वर्षांनंतर या स्पर्धेत पदक जिंकले आहे. भारतीय पुरुष बॅडमिंटन संघाने एशियाडमध्ये रौप्यपदक जिंकण्याची ही पहिलीच वेळ आहे.
सांघिक स्पर्धेत एकूण पाच सामने आहेत. तीन एकेरी आणि दोन दुहेरीचे सामने आहेत. एखाद्या संघाने सलग तीन सामने जिंकल्यास सामना तिथेच संपतो, अन्यथा सामना बेस्ट ऑफ फाइव्ह होतो. पहिले दोन सामने जिंकून भारतीय संघ एकावेळी 2-0ने पुढे होता. एकेरीमध्ये लक्ष्य सेन आणि दुहेरीत सात्विकसाईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी भारताला आघाडी मिळवून दिली. मात्र, यानंतर चीनने पुनरागमन करत पुढील तीन सामने जिंकून सुवर्णपदकावर कब्जा केला. तिसऱ्या सामन्यात किदाम्बी श्रीकांतला एकेरीत, चौथ्या सामन्यात ध्रुव कपिला-साई प्रतीक जोडीला दुहेरीत आणि पाचव्या एकेरी सामन्यात मिथुन मंजुनाथला पराभवाचा सामना करावा लागला.
प्रणयची दुखापत महागात
श्रीकांतने जर हा सामना जिंकला असता, तर भारताच्या खात्यात सुवर्णपदक आले असते. त्याचवेळी, सध्या भारताचा नंबर वन बॅडमिंटनपटू एच.एस. प्रणॉय पाठीच्या दुखापतीमुळे अंतिम सामना खेळू शकला नाही. त्याचे न खेळणे भारतीय संघाला महागात पडले. त्याच्या जागी मिथुनला खेळावे लागले.
भारताला पहिल्यांदाच रौप्य
भारतीय पुरुष बॅडमिंटन संघाने आशियाई क्रीडा स्पर्धेत आजपर्यंत कधीही सुवर्णपदक जिंकलेले नाही. या स्पर्धेत भारताला शेवटचे पदक 1986 मध्ये मिळाले होते. यात प्रकाश पादुकोण आणि विमल कुमार यांची महत्त्वाची भूमिका बजावली होती. 1974 आणि 1982 मध्येही भारतीय पुरुष बॅडमिंटन संघाने कांस्यपदक जिंकले होते. भारताने आतापर्यंत आशियाई बॅडमिंटन खेळामध्ये इतिहासात 10 पदकं जिंकली आहेत. यात तीन व्यक्तिगत पदकं, पुरुष संघाला तीन कांस्य, महिला संघाला दोन कांस्य मिळाली आहेत. तसेच पुरुष जोडी आणि मिश्र पुरुष जोडीमध्ये एक-एक पदक मिळालं आहे.