| खोपोली | प्रतिनिधी |
शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास पैसे दुप्पट-तिप्पट करून देण्याचे आमिष दाखवून अनेकांना फसविल्याची घटना येथे घडली आहे. फसवणूक झालेल्या चार ते पाच जणांनी पोलीस ठाण्यात लेखी स्वरुपात तक्रार दिली आहे. परंतु, फसवणूक झालेल्यांची संख्या मोठी असल्याचा पोलिसांना संशय आहे. ज्यांची फसवणूक झाली त्यांनी कागदपत्रांसह पुढील सात दिवसांच्या आत पोलीस उपनिरीक्षक हरेश काळसेकर यांच्याकडे संपर्क साधण्याचे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक शीतल राऊत यांनी केले आहे.
श्री विनय वर्टी (संचालक, युनिक कन्सल्टसी, रा. डोंबिवली) यांनी गेल्या काही वर्षांमध्ये शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून पैसे दुप्पट ते तिप्पट करून देतो असे आमिष दाखवून नागरिकांची फसवणूक केली आहे. पैसे परत मिळत नसल्यामुळे चार ते पाच जणांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर प्राथमिक चौकशी सुरू करण्यात आली. मात्र, फसवणूक झालेल्यांचा आकडा मोठा असण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तविण्यात आली आहे.






