| मुंबई | प्रतिनिधी |
टोलप्रश्नावर मनसे प्रमुख राज ठाकरे आता पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. एक-दोन ठिकाणे वगळता राज्यात बाकी सर्वत्र फक्त व्यावसायिक वाहनांनाच टोल आकारणी होते. असेे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी सांगितले होते. हे धादांत खोट आहे, अशी जोरदार टीका राज यांनी सोमवारी केली.
फडणवीस यांचे म्हणणे खरे असेल, तर मनसैनिक प्रत्येक टोलनाक्यावर उभे राहतील आणि व्यावसायिक वाहनांव्यतिरिक्त अन्य वाहनांना टोल लावल्यास आम्ही टोलनाके पेटवून टाकू, असा इशाराही ठाकरे यांनी दिला. त्यानंतर सोमवारी पत्रकार परिषद घेऊन राज यांनी भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी टोलबाबत दिलेल्या आश्वासनांचे जुने व्हिडिओ दाखवले.
टोलमुक्ती झाल्यानंतरही आपण टोल देत असू तर, हे पैसे जातात कुठे, असा सवाल करुन ते म्हणाले की, टोल हा महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा स्कॅम आहे. टोल हा अनेक राजकीय नेत्यांच्या उदरनिर्वाहाचे साधन आहे. त्यामुळे हे नेते टोल बंद करू शकत नाहीत. याप्रश्नी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, राज यांनी सरकारला इशारा दिल्यानंतर मनसैनिकांनी ठिकठिकाणी आंदोलने केली. मुलुंड टोलनाक्यावर धाव घेत आंदोलन सुरु केले.