जिल्ह्यातील 16 स्थानके, सात आगारांची तपासणी
| अलिबाग | प्रतिनिधी |
स्वच्छ सुंदर बस स्थानक अभियानाद्वारे स्थानकांमध्ये पुरविलेल्या सुविधांच्या पाहणीचा दौरा गेल्या दोन दिवसांपासून सुरु आहे. सोमवारी अलिबाग बस स्थानकात रत्नागिरी येथील पथकाने पाहणी करीत स्थानकांचे सर्वेक्षण केले.
हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बस स्थानक अभियानाच्या माध्यमातून प्रवाशांना दर्जेदार व गुणात्मक सुविधा देण्याचा प्रयत्न एसटी महामंडळाने केला आहे. रायगड जिल्ह्यातील एसटी बस आगारात व स्थानकांमध्ये या अभियानाला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळू लागला आहे. लघु, मध्यम व मोठ्या व्यावसायिकांसह वेगवेगळ्या संस्था, संघटनांच्या मदतीने स्थानकांची रंगरंगोटी करणे, प्रवाशांना सुविधा पुरविणे आदी कामे जिल्ह्यातील बस स्थानकांमध्ये करण्यात आली आहेत.
सुविधांची पाहणी करण्यासाठी जिल्ह्यात सर्वेक्षण सुरु करण्यात आले आहे. एसटी महामंडळ रत्नागिरीचे विभाग नियंत्रक प्रज्ञेश बोरसे, कामगार अधिकारी विलास चौगुले, विभागीय सांख्यिकी राकेश पवार, उपयंत्र अभियंता मृदूला जाधव यांचे पथक शनिवारी रायगड जिल्ह्यात दाखल झाले. या पथकाने महाड आगारासह पोलादपूर स्थानकाची सुरुवातीला तपासणी केली. जिल्ह्यातील आठ बस आगार व 19 बस स्थानक आहेत. त्यात कर्जत, महाड, श्रीवर्धन, माणगाव, रोहा, पेण, नंतर अलिबाग एसटी बस आगाराची पाहणी सोमवारी करण्यात आली. प्रवासी मित्रांसह स्थानकातील कामकाज, एसटी बसची स्वच्छता, स्वच्छतागृह, विश्रांती कक्ष, नियंत्रण कक्ष अशा वेगवेगळ्या ठिकाणाची पाहणी करून सर्वेक्षण करण्यात आले.तसेच जिल्ह्यातील 16 स्थानकांची पाहणी करण्यात आली. यावेळी अलिबाग एसटी बस आगार व्यवस्थापक अजय वनारसे, सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक राजेश साळवी, स्थानक प्रमुख अभिजीत मांढरे, वाहतूक नियंत्रक रितेश पाटील आदी उपस्थित हेोते.
गेल्या दोन दिवसांपासून रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहोत. सर्वेक्षण पथकाच्या माध्यमातून 16 स्थानके,सात आगारांची तपासणी केली आहे.
प्रज्ञेश बोरसे , विभाग नियंत्रक – रत्नागिरी







