विश्वचषक क्रिकेट स्पर्धा 2023 च्या आयोजन व्यवस्थेवरून आणि प्रामुख्याने तिकीट विक्रीवरून जगभरातील क्रिकेटरसिकांनी आयसीसी आणि बीसीसीआयवर तोंडसुख घेतलं आहे. जगातील सर्वोत्तम क्रिकेटपटूंमधील तसेच सर्वोत्तम संघांमधील लढतीच्या या क्रिकेट स्पर्धेच्या प्रसिद्धीऐवजी तिकीट विक्रीबाबत अधिक प्रसिद्धीवर ‘फोकस’ ठेवण्यात आला. प्रत्यक्षात तिकिटे उपलब्ध असतानाही तिकीट विक्रीची वेळ जाहीर होताच क्षणी तिकीट विक्रीच्या संकेतस्थळावर ‘सोल्ड आऊट’चे मथळे झळकायला लागले. नियोजित वेळेवर संगणकावर नोंद करून प्रतिक्षेत असणाऱ्या क्रिकेटरसिकांना काही तासांच्या प्रतिक्षेनंतर ‘सोल्ड आऊट’ हा एकच मथळा दिसायला लागला. आणि या सर्व क्रिकेटरसिकांच्या तळपायाची आग मस्तकाला पोहोचली; जेव्हा सलामीच्या इंग्लंड-न्यूझीलंड सामन्याच्या वेळी त्या सर्वांनी सव्वालाख प्रेक्षक क्षमतेचे मैदान पूर्णपणे रिकामे पाहिले. तिकिटे संपली होती, मग प्रेक्षक कोठे गेले? असे जळजळीत प्रश्न सोशल मीडियावर दिसायला लागले. याबाबतचा अधिक दोष जातो या विश्वचषकाचे आयोजक बीसीसीआयकडे. मुळातच, बीसीसीआयने या विश्वचषकाकडे क्रिकेटच्या दृष्टीकोनातून पाहिलेच नाही. त्याऐवजी त्यांनी क्रिकेटचा व्यापार आणि आर्थिक गोष्टींवर किंवा क्रिकेटचा धंदा कसा होईल यावर अधिक लक्ष दिले.
मुळातच, याआधीच्या विश्वचषक स्पर्धांमध्ये तब्बल वर्ष-वर्ष आधी सामन्यांची तिकीट विक्री करण्यात आली होती. याउलट, बीसीसीआयने आयोजन व्यवस्थेवरून खूपच गोंधळ घातला. त्यानंतर अखेरच्या क्षणी सामन्यांच्या तारखा बदलण्यासाठी आपली शक्ती पणाला लावली. नवरात्रीच्या सुरूवातीचा 15 ऑक्टोबरचा सामना एक दिवस आधी घेण्यासाठी हा सारा प्रपंच होता. पण, अहमदाबाद येथील त्या एका सामन्याच्या एका तारखेतील बदलामुळे आयसीसीला अन्य आठ सामन्यांच्या तारखा बदलाव्या लागल्या. तोपर्यंत दोन महिने आधी जाहीर झालेल्या वेळापत्रकानुसार देशातील आणि परदेशातील अनेक क्रिकेटरसिकांनी विमानप्रवास आणि राहण्याच्या व्यवस्थेची बुकिंग्जही करून टाकली. एका तारखेच्या बदलासाठी नऊ सामन्यांच्या तारखांमधील बदल क्रिकेट रसिकांसाठी तापदायक ठरले. बदललेल्या तारखांना प्रवास व राहण्याची बुकिंग्ज मिळाली नाहीतच; परंतु आधी बुक केलेली सामन्यांची तिकिटेही अनेकांना त्यामुळे मिळाली नाहीत. तिकिटे विक्रीसाठीची जबाबदारी घेणाऱ्या संस्थांचे गणितही चुकले. बदललेल्या तारखांची तिकिटे आधी बुक करण्यात आलेल्या तिकीटधारकांना मिळालीच नाहीत. न्यूझीलंड-इंग्लंडही गतविश्वचषकातील अंतिम फेरीतील पुढे सुरू झालेली लढत तिकिटे नसलेल्यांना पाहता आली नाही आणि तिकीट विक्रीची जबाबदारी स्वीकारलेल्या संस्थेला ती तिकिटे योग्य त्या ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यात अपयश आले. आश्चर्याची गोष्ट अशी की, संपूर्ण विश्वचषकच ‘हाऊसफुल्ल’ झाला, अशी शेखी मिरविणाऱ्या बीसीसीआयलाही आपल्या पोतडीतील सुमारे चार लाख तिकिटे काढून ती विक्रीसाठी द्यावी लागली. याचाच दुसरा अर्थ असा की, ही तिकिटे बीसीसीआयने स्वतःकडे राखून ठेवली होती. त्यापाठचा त्यांचा नेमका हेतू काय होता? पहिल्या चारही सामन्यात रिकामी स्टेडियम पाहून मग आयसीसीने आपल्या संकेतस्थळावर, उत्सुक क्रिकेटरसिकांसाठी तिकिटे उपलब्ध असल्याचे म्हटले. आयसीसीने तर प्रत्येक सामन्याची तिकिटं उपलब्ध असल्याचे जाहीर केले. भारताच्या सर्व सामन्यांची तिकिटे तर आधीच संपल्याचे जाहीर करण्यात आले होते. अन्य सामन्यांची तिकिटेही मिळत नव्हती. मग अचानक ही तिकिटे कुठून आली. विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार, अनेकांनी ही तिकिटे काळ्या बाजारात विकण्यासाठी अडवून ठेवली होती. लोकांकडील पैशाची कमतरता आणि पुढे येऊ घातलेल्या सणासुदीसाठी राखून ठेवलेला निधी यामुळे अधिक पैसे खर्च करून तिकिटे घेण्याचे लोकांनी टाळले. परदेशातील क्रिकेटरसिकांकडूनही अपेक्षेप्रमाणे मागणी काळ्या बाजारातील तिकिटांना आली नाही.
म्हणूनच अनेक संस्था आणि संघटना यांनी रोखून धरलेली तिकिटे अंगावर पडू नयेत म्हणून परत केली. मात्र तिकिटे संपली, ‘वर्ल्ड कप सोल्ड आऊट’ हे लोकांच्या मनावर बिंबविण्यात आयोजक यशस्वी ठरले. त्या यशस्वीपणातच त्यांचे अपयश लपलेले आहे. कारण, आता लोकांना तिकिटे नको आहेत. उशिरा विमानाची तिकिटे काढल्यास ती महाग पडू शकतात. हॉटेल्सही महाग झाली आहेत. अशा वेळी नवरात्री, दुर्गापूजा, दसरा, दिवाळी यासाठी राखून ठेवण्यात आलेल्या ‘बजेट’ला हात लावण्यास सर्वसामान्य क्रिकेटरसिक तयार नाही. कारण, त्यांच्याही मनाची तयारी आता झाली आहे, तिकिटे संपली आहेत, हे त्यांच्याही मनाने मान्य केले आहे. तिकिटांच्या काळ्या बाजारासाठी मार्केटिंग करण्याऐवजी विश्वचषक स्पर्धा, स्पर्धेतील संभाव्य हिरो-खेळाडू, चांगले संघ, त्यांच्यातील झुंजी यावर लक्ष केंद्रित केले असते, तर क्रिकेटला फायदा झाला असता.