विराट कोहलीचे अर्धशतक; रोहित शर्माचे शानदार शतक
| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
एकदिवसीय विश्वचषक-2023 मध्ये भारताने सलग दुसरा विजय नोंदवला आहे. संघाने अफगाणिस्तानचा 8 गडी राखून पराभव केला. भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धचा पहिला सामना 6 गडी राखून जिंकला होता. या विजयासह टीम इंडियाचे 4 गुण झाले आणि ते पॉइंट टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर पोहोचले. अरुण जेटली स्टेडियमवर बुधवारी प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानने 8 गड्यांच्या मोबदल्यात 273 धावा केल्या. टीम इंडियाने हे लक्ष्य अवघ्या 35 षटकांत पूर्ण केले. भारतीय कर्णधार रोहित शर्माने 63 चेंडूत शतक झळकावले. त्याने 131 धावांची खेळी खेळली. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने पहिल्या डावात 4 बळी घेतले.
रोहितने 84 चेंडूत 131 धावा केल्या
भारताकडून सलामीला आलेल्या कर्णधार रोहित शर्माने सुरुवातीच्या षटकांमध्येच आक्रमणाला सुरुवात केली. त्याने 30 चेंडूत अर्धशतक आणि 63 चेंडूत शतक झळकावले. 84 चेंडूत 131 धावा करून तो बाद झाला, या खेळीत त्याने 16 चौकार आणि 5 षटकार मारले.
रोहित विश्वचषकात 7 शतके झळकावणारा पहिला खेळाडू
रोहित शर्माने अफगाणिस्तानविरुद्ध 63 चेंडूत शतक झळकावले. एकदिवसीय विश्वचषकात 7 शतके झळकावणारा तो जगातील पहिला खेळाडू ठरला. त्याने सचिन तेंडुलकरचा 44 डावात 6 शतकांचा विक्रम मोडला. रोहितने 2015 मध्ये एक शतक आणि 2019 मध्ये 5 शतके झळकावली होती. रोहितच्या वनडे कारकिर्दीतील हे 31 वे शतक आहे.एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वाधिक शतकांच्या बाबतीत, त्याने ऑस्ट्रेलियाच्या रिकी पाँटिंगला मागे टाकले, ज्याच्या नावावर 30 शतके आहेत. रोहित सर्वाधिक शतकांच्या बाबतीत तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. सचिन तेंडुलकर पहिल्या स्थानावर (49 शतके) आणि विराट कोहली दुसऱ्या स्थानावर (47 शतके) आहे.रोहितनेही केवळ 30 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले होते. त्याने 63 चेंडूत शतक झळकावले. सर्वात कमी चेंडूत विश्वचषकात शतक झळकावणारा तो भारताचा खेळाडू ठरला. त्याने 1983 मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध 72 चेंडूत शतक झळकावणाऱ्या कपिल देवचा 40 वर्ष जुना विक्रम मोडला.
उमरझई-शाहिदी यांनी सावरला डाव
63 धावांत 3 गडी गमावल्यानंतर कर्णधार हशमतुल्ला शाहिदी आणि अष्टपैलू अजमतुल्ला उमरझाई यांनी अफगाणिस्तानचा डाव सांभाळला. दोघांनी वेळ घेत शतकी भागिदारी केली. सेट झाल्यानंतर उमरझईने कुलदीपविरुद्ध 2 आणि जडेजाविरुद्ध षटकार ठोकला.
अफगाणिस्तानला 63 धावांत 2 धक्के
पॉवरप्लेमध्ये इब्राहिम झद्रानची विकेट गमावल्यानंतर रहमानउल्ला गुरबाज आणि रहमत शाह यांनी अफगाणिस्तानला तंबी दिली. पण हे दोन्ही खेळाडू लागोपाठच्या षटकात बाद झाले. 13व्या षटकात हार्दिक पंड्याने गुरबाजला पॅव्हेलियनमध्ये पाठवले, तर 14व्या षटकात शार्दुलने रहमत शाहला एलबीडबल्यू केले.
पावरप्लेमध्ये अफगानिस्तानची सावध सुरुवात
नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्यासाठी मैदानावर उतरलेल्या अफगानिस्तानच्या टीमने सावध सुरुवात केली. बुमराह आणि सिराज यांचा सुरुवातीचा स्पेल ते चांगला खेळ होते. पण बुमराहने झादरानला बाद केले. त्यामुळे त्यांनी 10 ओव्हरमध्ये एक विकेट गमावत 48 धावा केल्या होत्या.
रोहितचे विश्वचषकातील 7 वे शतक
एकदिवसीय विश्वचषक 2023 मध्ये अफगाणिस्तानने भारताला 273 धावांचे लक्ष्य दिले आहे. नवी दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. संघाने 50 षटकात 8 गडी गमावून 272 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताकडून रोहित शर्मा आणि इशान किशन सलामीला आले. 8 षटकांनंतर संघाने बिनबाद 75 धावा केल्या आहेत. रोहितने शतक ठोकले.वर्ल्ड कपमध्ये सर्वात जलद 1000 धावा पूर्ण करण्याचा विक्रम यापूर्वी सचिन तेंडुलकरच्या नावावर होता. सचिनने 20 डावांमध्ये 1000 धावा वर्ल्ड कपमध्ये पूर्ण केल्या होत्या. पण रोहितने मात्र 19 डावांंमध्ये वर्ल्ड कपमध्ये एक हजार धावा पूर्ण केल्या आहेत. ही गोष्ट आतापर्यंत एकाही भारतीय खेळाडूला जमली नाही आणि रोहितच्या नावावर हा पराक्रम जमा झाला आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये रोहितच बाप
भारताचा कर्णधार रोहित शर्माने अफगाणिस्तान विरूद्धच्या सामन्यात संघाला दमदार सुरूवात करून दिली. त्याने 30 चेंडूत अर्धशतक ठोकत 12 व्या षटकात भारताला शतक पार करून दिले. दरम्यान, आपले अर्धशतक पूर्ण केल्यानंतर रोहित शर्माने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला. रोहित शर्मा आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज ठरला आहे. त्याने ख्रिस गेलचं 553 षटकारांचे रेकॉर्ड मोडले.दिल्लीच्या पाटा खेळपट्टीवर रोहित शर्माने भारताला आक्रमक सुरूवात केली. त्याचा पार्टनर इशान किशन सेट होण्याचा प्रयत्न करत असतानाच रोहितने दुसऱ्या बाजूने आपले अर्धशतक पूर्ण केले. अर्धशतक पूर्ण केल्यानंतर दुसऱ्याच चेंडूवर त्याने आपला आंंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील 554 वा षटकार मारला. या षटकारासोबतच रोहित शर्माने ख्रिस गेलचे सर्वाधिक (553) आंतरराष्ट्रीय षटकारांचा विक्रम मोडला.