| पेण | प्रतिनिधी |
पेण तहसिल कार्यालयामध्ये कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने एका-एका कर्मचाऱ्याला चार ते पाच विभागाचे काम पहायला लागत आहे. या कामाच्या तणामुळे कर्मचाऱ्यांचे मानसिक संतुलन बिघडत आहे. त्यातच काम होत नाही म्हणून नागरिक वारंवार कर्मचाऱ्यांची तक्रार तहसिलदारांना करत असतात. यामुळे कळत-नकळत नागरिक आणि कर्मचाऱ्यांमध्ये वादावाद होऊन तहसिल कार्यालयाच्या आवारात शांतता व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. काही कर्मचाऱ्यांच्या बदल्या होऊन त्यांच्या पेण कार्यालयात नियुक्ती दिली असताना त्या ठिकाणचे अधिकारी त्यांना तिथून सोडत नसल्याने पेण तहसिलमध्ये कर्मचाऱ्यांची कमतरता भासत आहे. पेण तहसिलदार स्वप्नाली डोईफोडे यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, कार्यालयात कर्मचाऱ्यांची कमतरता आहे, त्यामुळे नागरिकांना न्याय देण्यात आम्ही कमी पडत आहोत. परंतू, नागरिकांनी आमची अडचण जाणून आम्हाला सहकार्य करावे.







