| रेवदंडा | प्रतिनिधी |
कोर्लई गावाला फणसाड धरणातून पाणी पुरवठा होतो. या फणसाड धरणातून जलजीवन योजनेअंतर्गत पाणी पुरवठा सुरळीत सुरू होता; परंतु, सध्यस्थितीत मुरूड तालुक्यातून कोर्लई येथील मुख्यः रस्तावर रेवस-रेड्डी अंतर्गत रस्त्याचे नुतनीकरण, क्रॉकिटीकरण व रूंदीकरणाचे काम सुरू आहे. त्यासाठी खोदाईची कामे करण्यात आली आहेत. त्यामध्ये ठेकेदारांच्या निष्काळजीपणाने ठिकठिकाणी जलजीवन पाणी पुरवठा योजनेअंतर्गत असलेली पाईप लाईन फुटली आहे. या फुटलेल्या पाईप लाईनची तात्पुरती दुरूस्ती केली जाते. तरी देखील या फुटलेल्या पाईपलाईनमधून पाणी झिरपत राहते. परिणाम कोर्लई गावापर्यंत पाण्याचा पुरवठा अत्यंत कमी दाबाने होतो. त्यामुळे कोर्लईकरांना पुरेसे पाणी मिळत नाही. त्यामुळे एकप्रकारे कृत्रीम पाणी टंचाई कोर्लई गावात निर्माण झाली आहे.
काही दिवसांपुर्वी कोर्लई ग्रामस्थांनी या कृत्रीम भीषण पाणी टंचाईबाबत सरपंच राजश्री मिसाळ यांचेशी चर्चा-संवाद केला होता. परंतु, अद्यापी दोन महिने पुर्ण झाले तरीही पाण्याची टंचाई दुर झाली नसल्याने कोर्लई ग्रामस्थांचे बेहाल झाले आहे. त्यामुळे कोर्लई ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयाकडे धाव घेतली. यावेळी कोर्लई सरपंच उपस्थित नसल्याने ग्रामपंचायत अधिकारी आशा बिरवाडकर-काजारे यांच्याशी ग्रामस्थ व महिलांनी संवाद साधला; परंतु, सरपंच या विषयी बोलतील, असा पवित्रा ग्रामपंचायत अधिकारी यांनी घेतला. त्यामुळे ग्रामस्थांनी अधिक आक्रोश व्यक्त केला.







