| नेरळ | वार्ताहर |
कर्जत रेल्वे स्थानकात प्रवासी हे तीन दिशेने स्थानकात उपनगरीय लोकल आणि लांब पल्ल्याच्या गाड्या पकडण्यासाठी येत असतात. प्रवाशांसाठी रेल्वे प्रवासासाठी तिकीट काढण्यासाठी केवळ दोनच ठिकाणी व्यवस्था आहे. तर मुंबई दिशेकडे असलेली तिकीट खिडकी हि दुपारी बंद होते असते आणि त्यामुळे कर्जत रेल्वे स्थानकात फलाट एकवर छत्रपती शिवाजी महाराज स्मारक बाजूला आणखी एक पूर्णवेळ चालणारी तिकीट खिडकी उघडावी, अशी मागणी कर्जत शहरात सामाजिक कार्य करणाऱ्या नारी संघटनेने केली आहे.
कर्जत हे मध्य रेल्वेच्या मेन लाईन वरील महत्वाचे स्थानक समजले जाते. दक्षिणेकडे जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्या स्थानकात अतिरिक्त इंजिन लावण्यासाठी थांबत असतात. त्यामुळे या स्थानकात प्रवाशांची दिवस रात्र वर्दळ असते. त्यामुळे प्रवाशांना तिकीट काढण्यासाठी पळापळ करावी लागते. मुंबई दिशेकडे असलेल्या पदभार पुलावर असलेल्या कि वास्क मशीन या सातत्याने बंद असतात. त्यामुळे नाईलाजाने विना तिकीटने प्रवास करण्याची वेळ येते. वाढत्या लोकसंख्येनुसार तिकीट घर यांची व्यवस्था स्थानकात अनेक ठिकाणी असायला हवीत. स्थानकात मुंबई दिशेकडे असलेली तिकीट खिडकी सकाळी उघडते आणि दुपारी चार वाजता बंद होते. त्यामुळे प्रवाशांची वर्दळ फलाट एकवर सकाळपासून असते. त्यामुळे मध्य रेल्वे प्रशासनाने मुंबई दिशेकडे फलाट एकच्या बाहेर असलेल्या रेल्वेच्या जागेत तिकीट घर उभारण्याची मागणी नरी संघटनेने केली आहे.