। पनवेल । वार्ताहर ।
घणसोली सेक्टर-9 मधील ओमकार को. हौसिंग सोसायटीत तिसर्या मजल्यावर खिडकीचे ग्रिल बसविण्याचे काम करणारे दोघे कामगार खाली पडल्याने दोघा कामगारांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेतील मृत कामगारांना ठेकेदाराने कुठल्याही प्रकारची सुरक्षेची साधने न पुरविल्यामुळे सदरची दुर्घटना घडल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे रबाळे पोलिसांनी या दुर्घटनेला फॅब्रिकेशन कॉन्ट्रक्टरला जबाबदार धरुन त्याच्या विरोधात निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल आहे.
या दुर्घटनेत मृत झालेल्या कामगारांमध्ये मन्नु बिंदु राजभर (25) आणि देवानंद राजभर (23) या दोघांचा समावेश असून, हे दोघेही उत्तर प्रदेश राज्यातील गाजीपूर भागात राहण्यास होते. सध्या ते घणसोली सेक्टर-7 मध्ये रहाण्यास होते, तसेच ते फॅब्रिकेशन कॉन्ट्रॅक्ट नारायण आव्हाड याच्याकडे फॅब्रिकेशनचे काम करुन आपला उदरनिर्वाह चालवित होते. या दोघांचा तिसर्या मजल्यावरुन खाली पडून मृत्यू झाल्याचे आढळून आल्यानंतर रबाळे पोलिसांनी मृत तरुणांचा नातेवाईक मनोज भारद्वाज याच्या तक्रारीवरुन नारायण आव्हाड याच्याविरोधात निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल केला आहे.