स्थानिक प्रशासनाचे कारवाईकडे दुर्लक्ष
| अलिबाग | प्रतिनिधी |
निवासी प्रकल्प बांधकामासाठी लोढा कंपनीमार्फत मांडवानजीक मोठा भराव करण्यात आला आहे. या भरावामुळे भातशेतीसह मांडवा गाव, कोळीवाड्यांना पुराचा धोका निर्माण होण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे मांडवे माता टाकादेवी मच्छिमार सोसायटीचे चेअरमन अनिल भिंगारकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री यांना या भरावाबाबत निवेदन देऊन कारवाईबाबत कठोर पावले उचलण्यात यावीत, अशी मागणी केली आहे.
अलिबाग तालुक्यातील मांडवा बंदर दिवसेंदिवस विकसित होत चालले आहे. मांडवालगत असलेल्या जमिनीला प्रचंड महत्त्व प्राप्त झाले आहे. जलवाहतुकीने येणाऱ्या जाणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे. मांडवालगत जमीन खरेदी-विक्री करण्याचा प्रकार मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामध्ये धनदांडग्यांकडून भराव केला जात आहे. त्या भरावाचा परिणाम बाजूला असलेल्या गावे, वाड्यांना बसू लागला आहे. भरावातून पाणी जाण्याचा स्त्रोत बंद केल्याने अनेक गावे, वाड्यांना पुराचा धोका जाणवू लागला आहे.
तालुक्यातील मांडवा कोळीवाडा, मांडवा गाव हे समुद्राच्या अगदी लगत आहेत. या गावे, वाड्यांमधील नागरिकांचा मासेमारी हा पारंपरिक व्यवसाय आहे. खाडीमध्ये नौका नांगरल्या जातात. लगतच्या मोकळ्या जागेत नौका दुरूस्ती, नवीन नौकाबांधणी, मासळी सुकविणे अशी अनेक कामे वर्षानुवर्षे सुरू आहेत. या परिसरात असलेल्या खासगी मालमत्तेमध्ये लोढा बिल्डर्स यांची मालकी आहे. त्यांनी तब्बल 140 एकर क्षेत्रावर निवासी प्रकल्पाची बांधणी सुरू केली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात भराव करण्यात आला आहे. या भरावामुळे खारफुटीचे नुकसान होऊन पर्यावरणाची हानी होत आहे. या प्रकल्पाच्या बांधकाम व भरावामुळे उधाणाचे पाणी मांडवा कोळीवाड्यात व गावांमध्ये शिरून घरे, व अन्य मालमत्ता पाण्याखाली जाण्याचे संकट उभे राहिले आहे. गावे, वाड्यांना पुराचा धोका निर्माण झाला आहे. भराव करीत असताना पाणी जाण्याचे नियोजन नसल्याचा फटका पावसामध्ये गावांना बसू लागला आहे. ग्रामस्थांमध्ये चिंता निर्माण झाली आहे, असे मच्छिमार सोसायटीचे चेअरमन अनिल भिंगारकर यांनी सांगितले.
जिल्हाधिकाऱ्यांपासून वेगवेगळ्या विभागाकडे तक्रार करण्यात आली आहे. तरीदेखील कोणतीही कार्यवाही झाली नसल्याचा आरोप भिंगारकर यांनी केला आहे. त्यामुळे त्यांनी अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लेखी निवेदन दिले आहे. बांधकाम व भरावामुळे होणाऱ्या संकटापासून सुटका करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली असून, संबंधितांविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी, असेही त्यांनी सांगितले आहे. विकासाच्या नावाखाली लोढा यांच्याकडून होत असलेल्या भराव व बांधकामुळे लगत असलेली गावे, पुराच्या संकटात सापडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पूरपरिस्थिती निर्माण होण्याची चिंताही व्यक्त केली जात आहे. तरीदेखील प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने प्रशासनाच्या कारभाराबाबत नाराजीचे सूर उमटत आहे. याबाबत लोढा कंपनीमधील जनसंपर्क तथा एचआर विभागातील सेतू यांच्याशी प्रत्यक्ष संवाद साधला. त्यांनी व्हॉट्सॲपवर माहिती पाठवा, त्यानंतर वरिष्ठांकडे माहिती पाठवून त्यावर प्रतिक्रिया देऊ, असे सांगितले.
प्रशासनाचे दुर्लक्ष
विकासाच्या नावाखाली लोढा यांच्याकडून होत असलेल्या भराव व बांधकामुळे लगत असलेली गावे, पुराच्या संकटात सापडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पूरपरिस्थिती निर्माण होण्याची चिंताही व्यक्त केली जात आहे. तरीदेखील प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने प्रशासनाच्या कारभाराबाबत नाराजीचे सूर उमटत आहे.
मांडवा बंदरापासून काही अंतरावर भराव सुरू आहे, याविरोधात तक्रार प्राप्त झाली आहे. मंडळ अधिकारी यांच्यामार्फत पाहणी करून पुढील कार्यवाही केली जाईल.
विक्रम पाटील,
तहसीलदार, अलिबाग
अलिकडच्या पुराचा आमच्याशी काहीही संबंध नाही. ज्या भागात पूर आला आहे त्या भागात लोढा यांनी कोणतेही बांधकाम किंवा विकास कार्य हाती घेतलेले नाही.
उलट, अलिबागमधील पुराच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी लोढा यांनी सक्रियपणे अनेक पावले उचलली आहेत. खरं तर, आम्ही एकमेव खाजगी विकासक आहोत ज्यांनी पुढील १०० वर्षांसाठी भाग, मांडवा आणि धोकावडे यासारख्या आसपासच्या गावांना समाविष्ट करून वैज्ञानिक पूर कमी करण्याची योजना आखली आहे.लोढा कंपनी
जनसंपर्क कार्यालय