काम मिळत नसल्याने उचलले टोकाचे पाऊल
। मुंबई । प्रतिनिधी ।
मराठी चित्रपट, विविध मालिका आणि नाटकांमधून भूमिका साकारणारा अभिनेता तुषार घाडीगांवकरचे निधन झाले आहे. काम मिळत नसल्याने तणावातून तुषारने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. तुषार घाडीगावकरच्या आत्महत्येच्या वृत्ताने मराठी कलाविश्वात हळहळ व्यक्त होत आहे.
तुषार घाडीगावकर हा मूळचा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवलीचा असून मुंबईतील भांडूपमध्ये वास्तव्यास होता. गेल्या अनेक दिवसांपासून तुषारला कोणतेच काम मिळत नव्हते. त्यामुळे तुषारला प्रचंड नैराश्य आले होते. याच नैराश्याच्या भरात तुषार घाडीगावकर याने आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती समोर आली आहे.
तुषार घाडीगावकर याने आजपर्यंत अनेक मराठी मालिकांमध्ये लहान परंतु लक्षात राहणाऱ्या भूमिका केल्या होत्या. छोट्या पडद्यावरील ‘लवंगी मिरची’, ‘मन कस्तुरी रे’, ‘सुखाच्या सरींनी हे मन बावरे’ या मालिकांमध्ये काम केले होते. तर ‘भाऊबळी’, ‘उनाड’, ‘झोंबिवली’, या मराठी चित्रपटांमध्येही तुषारने भूमिका साकारली होती. अलीकडेच ‘सन मराठी’ वृत्तवाहिनीवर सुरु झालेल्या ‘सखा माझा पांडुरंग’ मालिकेतही तो झळकला होता. त्यामुळे एवढ्या तरुण अभिनेत्याने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलल्याने कलाकार व चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.