कला, क्रीडा तासिकांच्या वेळेत 10 ते 25 मिनिटांची कपात
। मुंबई । प्रतिनिधी ।
शालेय अभ्यासक्रमात पहिलीपासून हिंदी ही तिसरी भाषा म्हणून लागू करण्यात आली आहे. यानंतर शालेय शिक्षण विभागाने पहिलीच्या वर्गासाठी तासिकांचे नवे वेळापत्रकही जाहीर करण्यात आले आहे. मात्र हे करताना तिसऱ्या भाषेसाठी कला, शारीरिक शिक्षण आणि कार्यशिक्षण यांसारख्या विषयांच्या तासिका कालावधीत 10 ते 25 मिनिटांची कपात केली. त्यामुळे तिसऱ्या भाषेच्या अट्टहासापायी विद्यार्थ्यांच्या व्यक्तीमत्व विकासात महत्त्वाचे योगदान देणाऱ्या विषयांचीच वेळ कमी केल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
शिक्षक, पालक आणि शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांचा विरोध डावलून शालेय शिक्षण विभागाने इयत्ता पहिलीपासून ‘त्रिभाषा सूत्र’ स्वीकारून यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून तिसरी भाषा लागू केली. शाळा 16 जूनपासून सुरू झाल्या असून, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेकडून (एससीईआरटी) इयत्ता पहिलीच्या तासिकांचे वेळापत्रक गुरुवारी जाहीर करण्यात आले. शालेय वयात कला शिक्षण, शारिरीक शिक्षण, कार्यानुभव यांसारख्या विषयामुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळतो. त्यांच्या मानसिक, बौध्दिक विकासाला चालना मिळते. परंतु, तिसऱ्या भाषेसाठी या विषयांची वेळ कमी करण्यात आल्यानं आता संताप व्यक्त होत आहे.
असे आहेत नवीन बदल
जुन्या वेळापत्रकानुसार एका आठवड्यामध्ये कला शिक्षणासाठी ६० मिनिटांच्या चार तासिका होत्या. तसेच शारीरिक शिक्षण आणि कार्यशिक्षणासाठी आठवड्यातून प्रत्येकी दोन तासिका ४५ मिनिटांच्या होत्या. ‘एससीईआरटी’ने नव्या वेळापत्रकात या अभ्यासक्रमांच्या तासिकांमध्ये कोणतेही बदल केले नसले तरी कला शिक्षणाचा कालावधी ६० मिनिटांवरून ३५ मिनिटे केला आहे, तसेच शारीरिक शिक्षण आणि कार्यशिक्षणाचा कालावधी ४५ मिनिटांवरून ३५ मिनिटे केला आहे.
आनंददायी शनिवार उपक्रम
तासिकांच्या वेळेबाबत शिक्षण विभागाने काही प्रतिक्रिया दिलेली नाही. तर शिक्षण मंत्री दादा भुसे म्हणाले की, विद्यार्थ्यांसाठी 'आनंददायी शनिवार' हा उपक्रम आपण राबवत आहोत. यामध्ये कला-क्रीडा यांचा समावेश असेल. तसेच, विद्यार्थ्यांसाठी संमेलने, शैक्षणिक सहली इत्यादींचे आयोजनही करण्यात येणार आहे.