समीधा तांडेल, आर्या गडाडे राखीव खेळाडू
| रायगड | प्रतिनिधी |
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशने महाराष्ट्राचा 15 वर्षांखालील मुलींचा संघ जाहीर केला आहे. या संघात रायगडची खेळाडू रोशनी पारधी हीची निवड करण्यात आली आहे. रायगडच्या समीधा तांडेल व आर्या गडाडे यांची राखीव खेळाडू म्हणून निवड करण्यात आली आहे, अशी महिती रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत मते यांनी दिली.
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने आयोजित केलेल्या 15 वर्षाखालील मुलींच्या निमंत्रीत संघांच्या स्पर्धेत रायगड जिल्ह्याच्या संघातून खेळताना रोशनी पारधी हीने अष्टपैलू कामगीरी केली. याच स्पर्धेतील कामगिरी पाहून महाराष्ट्राचा संभाव्य संघ निवडण्यात आला होता.
या संघाच्या सराव शिबीरातून महाराष्ट्राचा 15 खेळाडूंचा अंतिम संघ निवडण्यात आला . या अंतिम संघात रोशनी पारधी हीची निवड करण्यात आली. रायगडच्या समीधा तांडेल व आर्या गडाडे यांची राखीव खेळाडू म्हणून निवड करण्यात आली. रायगडच्या या खेळाडूंना रायगड संघाच्या प्रशिक्षक राजश्री अडबळ यांचे मार्गदर्शन लाभले. रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत मते, कार्याध्यक्ष प्रदीप नाईक, उपाध्यक्ष प्रकाश पावसकर यांनी तसेच रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या सर्व सदस्यांनी या खेळाडूंचे अभिनंदन केले.