अनैतिक संबंध उघड केल्याचा राग
| नेरळ | वार्ताहर |
कर्जत तालुक्यातील पोशीर गावातील विवाहित महिलेने आपल्या पतीचे अनैतिक संबंध उघड केले होते. त्याचा राग मनात ठेवून त्या तरुणाने त्याची पत्नी आणि साक्षीदार महिलेला बेदम मारहाण करण्याची घटना घडली.
सदरची महिला ही गावोगावी फिरून भाजीपाला आणि मच्छीविक्री करून कुटुंब चालवते. त्या महिलेच्या 40 वर्षीय पतीचे कळंब जवळील कातकरीवाडीमधील एका महीलेबरोबर अनैतिक संबंध होते. त्याची माहिती विवाहित महिलेला मिळाली. त्यानंतर महिलेने बदलापूर येथील महिलेला सोबत घेवून दि.7 रोजी कळंब येथे पोहचली. तेथे पतीला रंगेहाथ पकडण्यात आले. त्या घटनेचा राग मनात ठेवून पतीने विवाहित महिला आणि साक्षीदार महिलेला दि.13 रोजी लाकडी दांडक्याने मारहाण केली. महिलेला कमरेवर, डाव्या हातावर गंभीर दुखापत केली. मारहाण थांबवण्यासाठी साक्षीदार महिला गेली असता तीला देखील मारहाण करण्यात आली. नेरळ पोलिस ठाण्यात या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.