| नेरळ | प्रतिनिधी |
राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी कर्जत येथे येऊन जंगलतोड आणि टोरंट प्रकल्पाविरोधात रणशिंग फुंकले आहे. राज्याचे मुख्यमंत्री यांच्यावर जोरदार टीका करताना सपकाळ यांनी आपल्या उद्योगपती मित्रासाठी सर्व काही बाजूला ठेवून काम करीत असल्याचा आरोप देखील केला आहे.
कर्जत येथे टोरंट प्रकल्पाला होणारा विरोध लक्षात घेता स्थानिकांच्या पाठीशी उभे राहण्यासाठी राष्ट्रीय काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह प्रदेश सरचिटणीस नंदा म्हात्रे, मिलिंद पाडगावकर, श्रद्धा ठाकूर, जिल्हाध्यक्ष डॉ.मनिष पाटील, राजाभाऊ ठाकूर, महिला जिल्हाध्यक्ष ॲड. श्रुती म्हात्रे, रेखा घरत, निखिल ढवळे, दिनानाथ देशमुख, संजय गवळी, सुरज पंडित, ऋषीकेश पवार आदी मान्यवर प्रदेश अध्यक्ष उपस्थित होते.
यावेळी बोलतांना सपकाळ यांनी, संरक्षित वन असताना देखील बुलडोझर फिरवण्याचे काम मुख्यमंत्री करीत असून, टोरंट कंपनीला लाभ देण्यासाठी सरकारी यंत्रणा कामाला लागली आहे. निवडक उद्योगपती यांना खुश करण्यासाठी जंगल नष्ट करण्याचे काम केले असून, देशात आदिवासी लोकांना वन हक्क कायद्याने त्यांच्या वहिवाटीची जमीन मिळाली. मात्र, तीच जमीन हेच मुख्यमंत्री टोरंटसाठी द्यायला निघाले असून, देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी आणलेला कायद्याला हरताळ फासण्याचे काम सरकार ठरवून करीत असल्याचा आरोप यावेळी केली. तर, वन हक्क कायद्याने जमिनी द्यायच्या आणि त्या जमिनी आपल्या उद्योगपती मित्रासाठी आंदण देऊन टाकायच्या, असा घणाघात सपकाळ यांनी केला. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची “एक पेड माँ के नाम” ही संकल्पना या ठिकाणी माझ्याकडून राबवली गेली. मी या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आईंच्या नावाने झाड लावले असून, ते झाड जगवण्याची जबाबदारी येथील ग्रामपंचायत प्रशासन आणि वन हक्क समिती यांनी घेतली असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, जंगलतोड झालेल्या भाग सेन्सिटिव्ह झोन असताना आम्ही स्वस्थ बसणार नाही, मुख्यमंत्र्यांनी शहाणपण दाखवण्याची गरज आहे; परंतु, त्यांचा अहंकार अडवा येत असून, त्यांना भ्रष्टाचाराच्या पलीकडे काहीही दिसत नाही. देशाचे सत्ताधारी नेते महाराष्ट्र लुटण्याचे काम करीत असून, स्थानिकांच्या पाठीशी आम्ही कायम असून, आम्ही काँग्रेस पक्षाच्यावतीने न्यायालयात याचिका दाखल करणार आहोत, अशी माहिती हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली.







