| नाशिक | प्रतिनिधी |
गारपीट आणि अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहाणी करण्यासाठी मंत्री छगन भुजबळ हे नाशिक दौऱ्यावर होते. येवल्यात मराठा आंदोलकांनी त्यांना विरोध केला. भुजबळांच्या वाहनाचा ताफा जाताच आंदोलकांनी गोमुत्र शिंपडून निषेध व्यक्त केला. तसेच निफाड तालुक्यातील कोटमगाव येथे मराठा समाजाच्या कार्यकऱ्यांनी त्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी आंदोलकांना रोखले. तसेच ताफा पुढे गेल्यानंतर आंदोलकांनी त्यांना काळे झेंडे दाखवत ‘भुजबळ गो बॅक’च्या घोषणा देखील दिल्या.
येवल्यातील सोमठाणदेश गावात मराठा आंदोलक आक्रमक झाले. मराठा आंदोलकांच्या आक्रमकतेमुळे भुजबळांनी त्यांच्या दौऱ्यात बदल केला. दरम्यान, छगन भुजबळ यांच्या पाहाणी दौऱ्याला अनेक गावांमध्ये विरोध झाला. बुधवारपासून एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. त्यामध्ये मराठा आंदोलक भुजबळांना पाहाणीसाठी येऊ नका, गावचा निर्णय झालेला आहे; असं सांगत आहेत.
भुजबळांनी भूमिका स्पष्ट करत दौऱ्याला जाणार असल्याचं सांगितलं. जिथे मला बोलावतील तिथं जाणार आणि जिथं बोलावणार नाहीत तिथं जाणार नाही. गावबंदी कराल, तर एक महिन्याची शिक्षा भोगावी लागेल, असा इशारा छगन भुजबळांनी यावेळी दिला.