| मुंबई | प्रतिनिधी |
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आज महापरिनिर्वाण दिन आहे. यंदाचा हा 67 वा महापरिनिर्वाण दिन आहे. त्यानिमित्त आंबेडकरी अनुयायींनी दादरच्या चैत्यभूमीवर गर्दी केली आहे. चैत्यभूमीवर अवघा भीमसागर लोटला आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून आंबेडकरी अनुयायी आज मुंबईत आले आहेत. बाबासाहेबांच्या स्मृतींना हे अनुयायी अभिवादन करत आहेत.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनीही चैत्यभूमीवर जात आंबेडकरांना अभिवादन केलं. तसेच सगळ्याच पक्षाचे नेते आज चैत्यभूमीवर येत आहेत. बाबासाहेबांच्या स्मृतींसमोर ते नतमस्तक होत आहेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 67 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त लाखोंच्या संख्येने चैत्यभूमीवर भीमसागर लोटला आहे. या आंबेडकरी अनुयायींना राहण्यासाठी तात्पुरता निवारा, सीसीटीव्ही कॅमेरे, टीव्ही, हिरकणी कक्ष उभारण्यात आला आहे. तसंच मुंबई पोलिसांकडून कोणताही अनुच्छित प्रकार घडू त्यासाठी बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 250 अधिकारी, 2 हजार कर्मचारी, सीआरपीएफ च्या 9 तुकड्या, आरपीएफचे जवान, दंगल नियंत्रण पथक, हरविणाऱ्या वृद्ध आणि लहान मुलांना शोधण्यासाठी पथके, सोबत समता सैनिक दलाचे 18 हजार जवान बंदोबस्तासाठी तैनात आहेत.







