बांगलादेशचा तोंडचा घास पळवला
| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
बांगलादेश आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात ग्लेन फिलिप्सने बांगलादेशचा तोंडचा घास पळवला. ढाका येथील दुसऱ्या कसोटीत फिरकीला साथ देणाऱ्या खेळपट्टीवर चौथ्या डावात किवींना विजयासाठी 137 धावांची गरज होती. मात्र, न्यूझीलंडची अवस्था 6 बाद 69 धावा अशी झाली होती. मात्र, ग्लेन फिलिप्सने नाबाद 40 धावा करत विजय खेचून आणला. त्याला मिचेल सँटनरने 35 धावा करत चांगली साथ दिली.
तत्पूर्वी, बांगलादेशने प्रथम फलंदाजी करत पहिल्या डावात सर्वबाद 172 धावा केल्या होत्या. मुशफिकूर रहीमनं सर्वाधिक 35, तर शहादत हुसैनने 31 धावा करत चांगली साथ दिली. तर न्यूझीलंडकडून ग्लेन फिलिप्सने 3, मिचेल सँटनरने 3 गडी बाद केले. एजाझ पटेलने 2 बळी घेत त्यांना चांगली साथ दिली. यानंतर बांगलादेशने दुसऱ्या डावात 180 धावा करत चोख प्रत्युत्तर दिले. न्यूझीलंडकडून ग्लेन फिलिप्सने सर्वाधिक 87 धावा केल्या. पहिल्या डावात किवींनी 8 धावांची मात्र महत्त्वपूर्ण आघाडी घेतली.
दुसऱ्या डावात बांगलादेशला 144 धावात रोखले. यावेळी एजाझ पटेलने दमदार गोलंदाजी करत बांगलादेशचे 6 फलंदाज तंबूमध्ये पाठवले. फिरकीपटू सँटनरने 3 गडी बाद केले. त्यामुळे न्यूझीलंडसमोर विजयासाठी 137 धावांचे आव्हान होते. हे आव्हान पार करताना न्यूझीलंडचा निम्मा संघ 50 धावात गार झाला होता. मात्र, सातव्या गड्यासाठी ग्लेन फिलिप्स (40 धावा) आणि मिचेल सँटनर (35 धावा) यांनी 68 धावांची नाबाद विजयी भागीदारी रचली.