भारतासाठी जिंकले कांस्यपदक
| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील मानिवली येथील निसर्गा गवळी हिने जर्मनी येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय आइस स्टॉक चॅम्पियनशिप स्पर्धेत कांस्यपदक पटकावत भारताचा तिरंगा अभिमानाने फडकावला आहे. या स्पर्धेत ऑस्ट्रिया, जर्मनी, फ्रान्स, कॅनडा यांसह तब्बल 15 देशांतील सुमारे 500 खेळाडूंनी सहभाग घेतला होता.
उणे तापमान प्रदेशात खेळला जाणारा हा खेळ सर्वात आव्हानात्मक क्रीडा प्रकारांपैकी एक मानला जातो. मायनस डिग्री तापमानात बर्फाच्या जाड लादीवर उभे राहून खेळाडूंना लक्ष्य अचूक साधावे लागते. घसरडा बर्फ, कडाक्याची थंडी आणि प्रत्येक फेकीतील अचूकता या तिहेरी आव्हानांवर मात करत निसर्गाने जागतिक स्तरावर स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. या स्पर्धेत निसर्गा हिने कांस्यपदक पटकावले. तसेच, निसर्गा गवळी हिने इंडि व्हिज्युअल टार्गेट प्रकारात शानदार कामगिरी करत जगात सातवा क्रमांक मिळवला आहे. अत्यंत उच्च दर्जाच्या या स्पर्धेत निसर्गान अचूक लक्ष्यवेध, मानसिक स्थैर्य आणि उत्कृष्ट कौशल्याच्या बळावर कांस्यपदक जिंकत भारताचे नाव उज्ज्वल केले आहे. या ऐतिहासिक यशाबद्दल तासगावकर समूहाचे चेअरमन डॉ. नंदकुमार तासगावकर यांनी निसर्गाचा विशेष सत्कार करून कौतुक केले.







