एलईडी, परप्रांतीय मासेमारीमुळे मासळी गायब
| उरण | वार्ताहर |
समुद्रामध्ये एलईडी आणि परप्रांतीय मासेमारीमुळे संकट ओढवले असून, त्यामुळे मासळी कमी होऊ लागली आहे. यामध्ये परदेशी मच्छिमार बोटी आणि त्यांच्याकडून होणाऱ्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून राजरोसपणे मोठ्या प्रमाणात मासेमारी करीत आहेत. दररोज लाखो टन मासळी पकडून परराज्यात विक्री केली जात आहे. त्यामुळे स्थानिक पारंपरिक मच्छिमारांना मासळी मिळत नसल्याने होड्या किनाऱ्या उभ्या करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे या मच्छिमारांवर उपासमारीचे संकट ओढावले आहे.
विद्युत जनसेटवर व एलईडी लाईट लाऊन मोठ्या प्रमाणात मासेमारी करीत असल्याने वर्षभरात मासेमारी हंगामात मिळणारी मासळी एलईडीधारक पकडून पलायन करीत आहेत. याचा विपरीत परिणाम राज्यातील पारंपरिक पद्धतीने मासेमारी करणाऱ्या लाखो मच्छिमारांवर होत आहे. राज्यात जून व जुलै या दोन महिन्यांच्या पावसाळी मासेमारी बंदी असते. मात्र त्यानंतर ही मासळीची आधुनिक तंत्राचा वापर करून लूट केली जात आहे. याचा परिणाम स्थानिक आणि पारंपरिक मासेमारी व्यवसायवर झाला आहे.
एलईडी म्हणजे काय? एलईडी मासेमारी पद्धत म्हणजे मासेमारी बोटीवर विद्युत दिवे घेऊन जात ते समुद्रात पाण्याखाली पेटविण्यात येतात. या दिव्यांच्या प्रकाशावर मासळीचे थवेच्या थवे आकर्षित होतात. या माशांना जाळी टाकून पकडले जातात. काही वेळातच मोठ्या प्रमाणात मासळी पकडली जाते. यामध्ये लहान-मोठी मासळी पकडली जाते. त्यानंतर छोटी मासळी पुन्हा समुद्रात फेकण्यात येते. मात्र, यातील बहुतांशी मासळी मरून नुकसान होते.