। बंगळूरु । वृत्तसंस्था ।
वेगात धावणारी ऑडी कार खांबावर आदळून झालेल्या भीषण अपघातात सात जणांचा मृत्यू झाला आहे. बंगळुरुत मंगळवारी रात्री 2.30 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. अपघात इतका भीषण होता की, कारचा अक्षरश: चुराडा झाला. अपघातात सहा जण जागीच ठार झाले तर एकाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृतांमध्ये तीन तरुणींचा समावेश आहे. सर्व मृत 20 वर्षांच्या आतील होते.
मृतांमध्ये तामिळनाडूचे आमदार वाय प्रकाश यांचा मुलगा आणि सूनेचाही समावेश आहे. तामिळनाडू पोलिसांनी याला दुजोरा दिला आहे. करुणा सागर तामिळनाडूमधील डीएमकेच्या आमदाराचा मुलगा असून सोबत त्याची पत्नीदेखील होती. दोघांचाही अपघातात मृत्यू झाल्याचं आमदाराने सांगितलं आहे.
व्हीआयपी नंबर प्लेट असणारी ही गाडी रात्री बंगळुरुत फिरत होती. यावेळी कोणीही सीटबेल्ट घातलेला नव्हता. रात्री सुमारी 2.30 वाजण्याच्या सुमारास ऑडी फूटपाथवर चढली आणि एका खांबाला धडक दिली. यामध्ये आमदाराचा मुलगा आणि सुनेसह सातजण ठार झाले. चालकाचं नियंत्रण सुटल्याने अपघात झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. सीसीटीव्हीत गाडी खूप वेगात होती असं दिसत असून अपघानंतर कारचा चेंदामेंदा झाला. अपघातानंतर सहा जणांचा घटनास्थळी तर एकाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.