| माणगाव | वार्ताहर |
नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मुंबई, ठाणे, पुणे आदी शहरातून कोकणाकडे मोठ्या प्रमाणात पर्यटक प्रवास करतात. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावर असणाऱ्या माणगाव शहरात मोठ्या प्रमाणावर वाहतुकीची नेहमीच कोंडी होत असते. यामुळे स्थानिक माणगावकरांना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागतो. शिवाय वाहतूक पोलिसांवर देखील मोठा ताण पडतो. यामुळे आई कनकाई सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुशील कदम आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ट्रॅफिक नियंत्रणासाठी स्वतः वाहतूक पोलिसांसमवेत उभे राहून वाहनांचे नियमन केले. यामुळे माणगाव शहरातील वाहतूक कोंडीची समस्या नियंत्रित राहिली.
मुंबई-गोवा महामार्गावरील तसेच पुणे-श्रीवर्धन मार्गावरील माणगाव हे मोक्याचे ठिकाण असून या ठिकाणी वाहने एकत्रित येत असल्याने माणगाव बस स्थानक व मोर्बा रोड, श्रीवर्धनकडे जाताना मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी होते. गेल्या काही दिवसांपासून माणगाव शहरापासून चार ते पाच किलोमीटर दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागलेल्या दिसून येत होत्या. त्यामुळे वाहतूक कोंडीमुळे पर्यटकांना व सर्वसामान्य नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत होता. पोलिसांची ही मोठ्या प्रमाणात दमछाक होत होती. त्यामुळे कनकाई संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी वाहतूक पोलिसांना केलेल्या मदतीमुळे काहीसा दिलासा मिळाला आहे.







