राम मंदिराचा विषय निवडणुकीपर्यंत तापवत ठेवण्याची रणनीती
। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
लोकसभा निवडणुकीच्या तयारीसंदर्भात मंगळवारी दिल्लीत झालेल्या भाजपच्या उच्चपदस्थ बैठकीनंतर पक्षाने कार्यकर्त्यांना ‘तिसरी बार मोदी सरकार, अबकी बार चार सौ पार’ ही नवी घोषणा दिली. पक्षाध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी घेतलेल्या दिल्लीतील बैठकीत राम मंदिराचा विषय निवडणुकीपर्यंत तापवत ठेवण्याबाबत सविस्तर रणनीती ठरविण्यात आल्याची माहिती मिळत आहे. सलग तिसऱ्या लोकसभा निवडणुकीत भाजप ‘ब्रँड मोदी’च्याच आधारावर मतदारांसमोर जाणार हे स्पष्ट आहे.
गेल्या पाच वर्षांत भाजपने गरीब कल्याण योजना आणि मोदींच्या प्रतिमेचा प्रचार करून ओबीसी, महिला व आदिवासी समाजाची मते मोठ्या संख्येने आपल्याकडे वळविली आहेत. उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालपासून मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान आणि गुजरातपर्यंतच्या राज्यांच्या निवडणुकांमध्ये त्याचा परिणाम दिसला आहे. ‘सबका साथ, सबका विकास’ नारा देताना भाजपने विरोधकांच्या निवडणूक शस्त्रांची धार बोथट केली आहे. लोकसभा निवडणुकीसाठी प्रत्येक विधानसभा मतदारसंघात जाऊन गटनिहाय बैठका भाजपने सुरू केल्या आहेत.
खासदार टिकवण्याचे आव्हान मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटलेल्या महाराष्ट्रा भाजपसमोर कडवे आव्हान आहे. सन २०१९मध्ये महाराष्ट्रात एकट्या भाजपने २३ जागा जिंकल्या होत्या. आता भाजप २५पेक्षा अधिक जागांवर उमेदवार उभे करणार आहे. पश्चिम बंगाल आणि बिहारमध्ये किमान आहे तेवढे खासदार टिकवण्याचे आव्हान भाजपसमोर आहे.
दक्षिणेकडे विशेष लक्ष भाजपचे दोन्ही वरिष्ठ नेते दक्षिणेकडे विशेष लक्ष देत असून, नवीन वर्षात तीन आणि चार जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दौरा तमिळनाडू, पुद्दुचेरी आणि केरळमधून सुरू होईल. उत्तर, ईशान्य आणि मध्य भारतात मजबूत स्थितीत आलेल्या भाजपला या वेळेसही 'ब्रँड मोदी'चाच आधार घ्यावा लागणार किंवा भाजप तसेच करणार हे स्पष्ट झाले आहे.
तेलंगणमध्ये १७ पैकी १० जागा जिंकण्याचे लक्ष्य तेलंगणमध्ये पक्षाच्या हाती भरीव लागू शकले नाही व तेथेही काँग्रेसला दक्षिणेत आणखी बळ मिळाले. गृहमंत्री अमित शहा यांनी आता तेलंगणमध्ये लोकसभेच्या १७ पैकी १० जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले आहे. भाजप तामिळनाडूमधील अण्णा द्रमुकच्या दोन्ही गटांना एकत्र करण्याचे काम करीत आहे आणि पक्षाशी युती करण्याची योजना आखत आहे.