बचतगटांकडून एक लाख 53 हजार 541 गणेशमूर्ती तयार; दोन हजार 250 मूर्ती परदेशात पाठविणार
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
यंदा गणरायाचे आगमन 23 दिवसांवर येऊन ठेपले आहे.बाप्पाच्या स्वागतासह सजावटीची लगबग आता सुरु झाला आहे. वेगवेगळ्या कला केंद्रामध्ये गणेशमूर्ती तयार करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील सुमारे 247 बचतगटातील महिलांनी एक लाख 53 हजार 541 गणपतीमूर्ती तयार केल्या आहेत. यामधील दोन हजार 250 गणेशमूर्ती परदेशात पाठविण्यात येणार आहेत. रायगड जिल्हा परिषदेच्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या पुढाकारातून उमेद अभियानांतर्गत गणेश मूर्ती व्यवसायात महिलांनी पाऊल ठेवले आहे. या व्यवसायातून महिलांना आर्थिक स्थैर्य प्राप्त झाले आहे.
रायगड जिल्ह्यातील पेण तालुका गणपती मूर्तींचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. पेणमध्ये तयार केलेल्या गणपती मूर्तींना देश, विदेशात मोठी मागणी आहे. सुबक आखणी, नेटकी बैठक, सुंदर कोरीवकाम, रेखीव डोळ्यांची रचना आणि रंगकाम यामुळे पेणच्या गणपती मूर्तींना खास ओळख प्राप्त झाली आहे. गणेशमूर्तीना भौगोलिक मानांकन मिळाले आहे. या व्यवसायात पेण तालुक्यातील महिला बचतगट उतरले आहेत. उमेद अभियानामार्फत महिला बचतगटांना फिरता निधी तसेच ग्रामसंघांना समुदाय गुंतवणूक निधी आणि बँकांमार्फत पतपुरवठा या व्यवसायासाठी करण्यात आला आहे. यामुळे महिलांच्या या व्यवसायाला गती मिळाली आहे. या व्यवसायामुळे महिलांच्या हाताला काम मिळाल्याने त्या अधिक सक्षम बनल्या आहेत. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत जिल्ह्यातील सुमारे 247 बचत गटातील महिला या गणपती व्यवसायात सहभागी झाल्या आहेत. महिला बचत गटांनी एक लाख 53 हजार 541 गणपतीमूर्ती तयार केल्या. यामधील दोन हजार 250 गणेशमूर्ती परदेशात पाठविण्यात येणार आहेत. बचत गटातील महिलांना व्यवसायाच्या दृष्टीने मार्गदर्शन केल्याने, जिल्ह्यातील महिला शक्ती गणपती मूर्ती व्यवसायात गरुडझेप घेणार आहेत. रायगड जिल्ह्यातील अलिबागसह प्रत्येक तालुक्यांमध्ये महिलांनी पुढाकार घेत अनेक गणेशमूर्तींना साकारण्याचे काम केले आहे.त्यामुळेच जास्तीत जास्त महिलांनी या व्यवसायात सहभागी होण्याचे आवाहन रायगड जिल्हा परिषदेतर्फे करण्यात आले आहे. त्या माध्यमातून उपजीविकेच्या नवनवीन संधी निर्माण होऊन महिला सक्षमीकरणाकडे वाटचाल करता येणार आहे.
मुर्तींवर दृष्टीक्षेप
तालुका - संख्या
अलिबाग - 328
कर्जत - 614
खालापूर - 950
महाड - 70
माणगाव - 2125
मुरुड - 2210
पनवेल - 180
पेण - 145284
रोहा - 195
श्रीवर्धन - 240
सुधागड - 600
तळा - 150
उरण - 695
एकूण 153541







