| अलिबाग | प्रतिनिधी |
नागाव येथील पी. एन. पी. सायरस पूनावाला स्कूलची विद्यार्थिनी आर्या कृष्णा भोईर हिने जिल्हास्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. रसायनी येथील एचओसी कॉलनीतील पिल्लई महाविद्यालयात आयोजित जिल्हास्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धेत आर्या हिने 3000 मीटर धावणे आणि 4000 मीटर क्रॉस कंट्री या दोन्ही स्पर्धांमध्ये द्वितीय क्रमांक पटकावला. या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर तिची मुंबई विभागीय स्तरावरील स्पर्धेसाठी निवड झाली आहे. आर्याच्या या उल्लेखनीय यशाबद्दल पी. एन. पी. एज्युकेशन सोसायटीच्या कार्यवाह चित्रलेखा पाटील यांनी तिचे विशेष कौतुक करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका गीतिका भूचर, क्रीडाशिक्षक राकेश म्हात्रे, शिक्षकवृंद आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आर्याचे मनःपूर्वक अभिनंदन केले. आगामी मुंबई विभागीय स्पर्धेसाठी तिला शुभेच्छा देत तिच्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी सदिच्छा व्यक्त केल्या. आर्याच्या या यशामुळे शाळेच्या क्रीडा क्षेत्रातील कामगिरीत मानाची भर पडली असून तिच्या यशाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.






