माजी आमदार पंडित पाटील यांचा आरोप
| अलिबाग | प्रतिनिधी |
आगरदांडा ते दिघी पुलासाठी तेराशे कोटी रुपये मंजूर करण्यात आली आहेत. मात्र जिल्ह्यातील जीर्ण झालेल्या साळाव, आंबेत पूलांच्या नूतनीकरणाकडे सरकारने दुर्लक्ष केले आहे. या पुलांच्या दुरुस्तीवर कोट्यवधी रुपये खर्च केले जात आहेत. परंतु जीर्ण झालेल्या पुलांच्या नूतनीकरणाकडे करीत असल्याचा आरोप माजी आ. पंडित पाटील यांनी केला आहे.
रायगड जिल्हा पर्यटनाच्या दृष्टीने महत्वाचे ठरत आहेत. लाखो पर्यटक जिल्ह्यातील पर्यटन स्थळांना भेटी देतात. यामधून स्थानिकांना रोजगार उपलब्ध होत आहे . जिल्ह्यात औद्योगिकीकरण झपाट्याने वाढत आहे . मात्र जिल्ह्यातील मुंबई – गोवा महामार्गावरील पनवेल – इंदापूरचे काम गेल्या अनेक वर्षांपासून रखडल्याने पर्यटनावर त्याचा परिणाम होण्याची भीती वक्त केली जात आहे. अलिबाग – मुरुड – रोहा या तीन तालूक्यांना जोडणारा साळाव पूल कमकुवत झाला आहे. या पूलाच्या दुरुस्तीसाठी सात ते आठ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहे. रत्नागिरी – रायगड जिल्हयाला जोडणाऱ्या आंबेत पुलाच्या दुरुस्तीसाठी देखील खर्च केला जात आहे परंतु प्रत्यक्षात या पूलांच्या नूतनीकरणाकडे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. गेल्या अनेक वर्षापासून रखडलेल्या पनवेल – इंदापूर चौपदरीकरणाबरोबर पुलांच्या नूतनीकरणाकडे सरकारने लक्ष देणे गरजेचे आहे, असे पंडित पाटील म्हणाले.
रेल्वेच्या वेळेत बदल करा
जलमार्गाने अलिबागकडे येणाऱ्या पर्यटकांसह स्थानिकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र मालवाहतूक रेल्वेमुळे प्रवाशांना तासनतास चोंढी फाटा येथे थांबावे लागत आहे. त्यामुळे या ठिकाणी वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होते. ही वाहतूक कोंडी रोखण्यासाठी आरसीएफ कंपनीने रेल्वेच्या वेळेत बदल करावा असी मागणी माजी आ. पंडित पाटील यांनी केली आहे.