पोलीस यंत्रणांमध्ये खळबळ; अफवा पसररविणर्याचा शोध सुरु
। मुंबई । प्रतिनिधी ।
कुलाब्यातील छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय, वरळी येथील नेहरू विज्ञान केंद्र आणि भायखळा येथील प्राणिसंग्रहालयासह आठहून अधिक ठिकाणी बॉम्ब ठेवण्यात आल्याचा ई-मेल शुक्रवारी एका अनोळखी व्यक्तीने पाठवला.
या सर्व महत्त्वाच्या संस्थांना एकाच मेल आयडीवरून धमकी देण्यात आली. या आठ ठिकाणी बॉम्ब ठेवण्यात आले असून त्यांचा कधीही स्फोट होईल असे या मेलमध्ये नमूद करण्यात आले होते. या धमकीनंतर छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालायासह इतर ठिकाणी पोलिसांनी बॉम्बशोधक आणि नाशक पथकाच्या मदतीने तपासणी केली. संशयास्पद असे काहीच न आढळल्याने ही धमकी केवळ अफवाच असल्याचे स्पष्ट झाले.
बॉम्बची अफवा पसरवणार्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विशेष पथक तयार केले आहे. नागरिकांमध्ये भीती किंवा दहशत निर्माण करण्याच्या हेतूने अफवा पसरवणे, गुन्हेगारी धमकी आणि इतर कलमांतर्गत कुलाबा पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी पोलिसांचे विशेष पथक तयार करण्यात आले आहे.






