महायुतीचा (अ)समन्वय पदाधिकारी मेळावा
| रायगड | आविष्कार देसाई |
राज्याच्या विविध भागांमध्ये महायुतीच्या खासदार, आमदार आणि पदाधिकाऱ्यांमध्ये विस्तव जात नसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. रायगड जिल्ह्यामध्ये याची सर्वाधिक प्रचिती येत आहे. शिंदे गट-भाजपा-अजित पवार गट हे ऐकमेकांवर चांगलेच तोंडसुख घेताना दिसत आहेत. त्यांच्यामध्ये कमालीचा समन्वयाचा अभाव असल्यानेच ते आपापसात बेछूट आरोप करताना दिसत आहेत. सर्व काही आलबेल आहे हे दाखवण्यासाठी अलिबागमध्ये सर्व पदाधिकाऱ्यांचा एकत्रित ‘अ’समन्वय मेळावा आयोजित केला आहे.
राज्यात शिंदेनी सतांतर केल्यानंतर शिंदे-फडणवीस यांचे सरकार स्थापन झाले होते. त्यानंतर काहीच महिन्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमधून फुटून अजित पवार गट वेगळा झाल्याने तोही सत्तेत वाटेकरी झाला. लोकसभा निवडणूक एप्रिल महिन्यात होण्याची शक्यता आहे. त्यानुसार सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. रायगड लोकसभा मतदारसंघात सध्या सुनील तटकरे हे खासदार आहेत. मात्र, त्यांची जागा आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी भाजपाने जोरदार तयारी केली आहे. तर, दुसरीकडे शिंदे गट हा विकासकामे मिळत नसल्याचे कारण पुढे करत जिल्ह्यातील भाजपाच्या पदाधिकाऱ्यांबरोबर हाणामारी करत असल्याचे चित्र आहे.
या सर्व राजकीय परिस्थितीमध्ये शेकाप, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि शिवसेना (ठाकरे गट) यांनी स्वतःला या भांडणांपासून अलिप्त ठेवले आहे. मतदारांच्या अडअडचणी, त्यांचे प्रश्न सोडवण्यावर त्यांनी भर दिला आहे. त्यामुळे मतदारांमध्ये त्यांच्याबद्दल आदर वाढत असल्याचे दिसून येते. सत्तेचा उपभोग घेण्यासाठी आणि पुन्हा उपभोग घेता यावा यासाठी पुन्हा सत्ता मिळवण्यासाठी महायुतीचा आटापिटा जनतेच्या नजरेतून लपलेला नाही.
तटकरे यांनी पुन्हा एकदा रायगड लोकसभेवर हक्क सांगितला आहे, तर भाजपानेदेखील रणांगणात उमेदवार उतरवण्याची तयारी केली आहे. त्यामुळे यांच्यामध्ये अजिबात समन्वय नसल्याचे दिसून येते. लोकसभा निवडणुकांची तयारी सुरु असतानाच शिंदे गट एक पाऊल पुढे आहे. त्यांनी आधीच अलिबाग, कर्जत, महाड हे विधानसभा मतदारसंघ आपल्याच पदरात पडावेत यासाठी जमीन तयार करण्यास सुरुवात केली आहे. याचसाठी अलिबाग विधानसभा मतदारसंघामध्ये ते भाजपाला घुसण्यास अटकाव करत आहेत. काहीच दिवसांपूर्वी एकाला मारहाण करण्यात आली होती. भाजपाच्या समर्थकांनी ही मारहाण केल्याची तक्रार शिंदे गटाने थेट वरिष्ठ पातळीवर केली होती. त्यामुळे दोन्ही गटांकडून जशास तसे उत्तर दिले जात आहे.
या सर्वाचा परिणाम त्या-त्या पक्षाची प्रतिमा मलिन होण्यावर होत आहे. ती सुधारण्यासाठी पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी एकत्र आणि एकसंघ राहिले पाहिजे यासाठी रविवारी पदाधिकारी यांचा समन्वय मेळावा आयोजित केला आहे. मात्र, सध्याची परिस्थिती पाहता हा समन्वय फार काळ टिकेल असे दिसत नाही.