। मुंबई । प्रतिनिधी ।
उद्धव ठाकरे यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मतदार संघात दौरा केला. कल्याण लोकसभा मतदार संघात त्यांनी शाखेचे उद्घाटन केले. कल्याण लोकसभा मतदार संघाची जबाबदारी येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत फार महत्वाची असल्याचे ठाकरे म्हणाले. तसेच, काल मोदींनी घराणेशाहीवर आरोप केला, मात्र त्यांना गद्दारांची घराणेशाही प्राणप्रिय आहे. ७० कोटींचे घोटाळे करणारे त्यांना आजुबाजूला चालतात, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.
पुढे ठाकरे म्हणाले, गद्दार घराणेशाहीच्या मुळावर घाव घालण्यासाठी मी या मतदार संघात आलो आहे. काल मोदी महाराष्ट्रात येऊन गेले. ते पुन्हा येतील. त्यांचे तिळगुळ वाटप सुरू आहे. पण या लोकसभेच्या निवडणुकीत हुकुमशारहीवर संक्रात येणार आहे, हे मात्र नक्की. मी देशभक्त आहे, आंधळा भक्त नाही. जेव्हा राम मंदिर बांधले गेले नव्हते, तेव्हा आम्ही दोनदा तिथे गेलो होतो. शिवजन्मभूमीची माती घेऊन मी अयोध्येला गेलो होतो. मला जेव्हा वाटेल तेव्हा मी अयोध्येला जाईन. कारसेवक नसते तर अयोध्येत राम मंदिर बनले नसते, असेही ते म्हणाले.